लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नानंतर केवळ सहा महिन्यांतच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी विवाहित महिलांचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन-चार महिन्यांत विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणी व्यवसाय आटण्यासाठी, कोणाला कार हवी प्लॉटसाठी पैसे हवे आहेत. याच पैशांच्या मागणीतून विवाहित महिलेचा जाच सासरी सुरू असल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.
भंडारासह जिल्ह्यातील विविध १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अलीकडे विवाहित महिलांचा छळ केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरवर्षी महिला तक्रार निवारण केंद्राकडे जवळपास २०० ते २५० च्या घरात तक्रारींचा आकडा जातो. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, स्थानिक पोलिस ठाण्यात विवाहित महिला तक्रार दाखल करण्यासाठी येतात.
त्यावेळी पोलिस प्रशासनाकडून सासरच्या मंडळींना बोलावून घेत समुपदेशन केले जाते. प्रकरण मिटले नाही, तर गुन्हा दाखल केला जातो. काही प्रकरणात 'भरोसा सेल' सुनावणी घेतली जाते. सुनावणीमधून समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही प्रकरणात कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.
६० टक्के प्रकरणात घडवून आणला समेट... भरोसा सेलकडे दाखल झालेल्या प्रकरणात समुपदेशनानंतर अनेक प्रकरणांत समेट घडवून आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. अनेकांचा संसार पुन्हा रुळावर आला आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जोडप्यांनी तडजोड करत संसार पुन्हा फुलविला आहे. सुनावणीनंतर पोलिस प्रशासनाला किमान ६० टक्क्यांवर प्रकरणामध्ये तडजोड करण्यात यश आले आहे. काही प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; अनेकांवर गुन्हे• भंडारा शहरासह जिल्ह्यातील विविध १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पैशाबरोबरच राहिलेल्या हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ केला जात असल्याने अनेक महिलांनी त्या-त्या पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली आहे.• याबाबत काही प्रकरणात पती, सासू-सासरे, नणंद, दिराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही प्रकरणांत न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे. हुंडाबळीच्या खटल्यात आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही खटल्यामध्ये सासू-सासऱ्यालाही शिक्षा आणि दंड सुनावण्यात आली.
छळामुळे आत्महत्या...काही प्रकरणात सासरच्या मंडळींचा छळ सहन न झाल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली, तर काही प्रकरणांत विवाहितेचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस ठाण्यात विवाहित महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.
कोणाला हवा बंगला, तर कोणाला कार?• विवाहित महिलेच्या छळाची कारणे वेगवेगळी आहेत. काही घरात पैशाच्या कारणावरून, मानपानाच्या कारणावरून विवाहितेचा जाच केला जातअसल्याचे तक्रारीतून समोर आले. • काही ठिकाणी तर कोणाला बंगला खरेदी करायचा आहे, तर कोणाला कार खरेदी करायची आहे, यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून छळ करण्यात आला आहे.
गत पाच वर्षांमध्ये वाढले महिला छळाचे गुन्हे...• महिला तक्रार निवारण केंद्राबरोबरच त्या-त्या पोलिस ठाण्यांकडे येणाऱ्या तक्रारीत महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद अधिक आहे.शिवाय, विवाहितांच्या छळाच्याही घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. • २०१९ ते २०२४ या कालावधीत महिला अत्याचाराबरोबरच विवाहित महिलांच्या छळांचा टक्का वाढला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा आकडा दरवर्षी किमान २५ ते ५० असा वाढत आहे.
दाखल होणाऱ्या तक्रारींची सत्यता पडताळणी केली जाते. गंभीर असणाऱ्या गुन्ह्यात थेट गुन्हे दाखल केले जातात. काही प्रकरणात थेट सासरच्या मंडळींना बोलावून घेत समज दिली जाते. हा वाद तडजोडीतून मिटवण्याचा प्रयत्न केला जातो असे पोलिसांनी सांगितले.