तुमसर : बपेरा - आंबागड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना नियमित अद्यापनाचे कार्य होत नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता दुसऱ्यांदा तुमसर पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात १९ विद्यार्थ्यांना सरपंच, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी धडक दिली. आम्हाला शिकवा असा आग्रह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी धरल्यावर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांचा क्लास घेतला. शासकीय कामात अडथळा आणीत असल्याची तक्रार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात करून पोलिसांना पाचारण केले होते.बपेरा आंबागड येथे जि.प. प्राथमिक शाळेत मागील तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन केले जात नाही. दोन शिक्षकी शाळेत एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. वर्ग १ ते ४ ची ही शाळा आहे. सध्या एक शिक्षक ए.डी. वासनिक वैद्यकीय रजेवर आहेत. तर दुसऱ्या सहाय्यक शिक्षिका पी.बी. कापसे शाळेत वेळेवर येत नसल्याची तक्रार सरपंच बबिता भिवगडे, उपसरपंच ईश्वरदयाल बंधाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेश दमाहे यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे केली होती. दि. १३ जानेवारीला विद्यार्थ्यांसह पं.स. कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी धडक दिली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १५ दिवसापर्यंत पर्यायी व्यवस्था केली होती. आंबागड येथून बपेरा (आं) येथे एक शिक्षक पाठविले होते. त्यांची मुदत संपल्याने ते पूर्वीच्या शाळेत रूजू झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता वर्ग १ ते ४ चे १९ विद्यार्थी विद्यार्थिनींनी पं.स. चे गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. यात वर्ग १ चे ४, वर्ग २ चे ३, वर्ग ३ ते १० व वर्ग ४ च्या २ विद्यार्थ्यांचा समावेश होता. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी येथे क्लास घेतला. या शाळेत शालेय पोषण आहार तयार करणारी महिला येथे शिक्षक नसल्यावर अध्यापनाचे कार्य करतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी व उपाध्यक्ष रमेश पारधी यांना भेटून पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या. मानधनावर पर्यायी शिक्षक नियुक्त करण्याचा आदेश शिक्षण समिती सदस्यांनी दिला. गर्रा हेटी येथे सुद्धा असा आदेश देण्यात आला. चर्चेला केंद्रप्रमुख वसंत साठवणे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात चिमुकल्यांचा ठिय्या
By admin | Published: February 04, 2015 11:08 PM