गत पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर काेसळले आहेत. दर इतके खाली येतील, याची कल्पनाही शेतकऱ्यांना नसावी. पावसाने मारली दडी, भाव पडण्यास कारणीभूत असल्याचे बाेलले जात आहे. अशातच एक व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर धूम करीत आहे. राज्यातील कुठल्या तरी भाजी मंडईत शेतकरी जाेरजाेराने ओरडून कमी किमतीत रस्त्यावर भाजीपाला विकत असल्याचा ताे व्हिडिओ आहे. शंभर रुपयाला ढाेबळी मिरचीचे पाेते, पत्ताकाेबीचा पाेता घ्या. असे जाेरजाेराने ओरडत आहे. हा व्हिडिओ भंडारा जिल्ह्यातही व्हायरल हाेत असल्याने बागायतदार शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आपण पिकविलेल्या भाजीपाल्याला भाव मिळणार की नाही, असा प्रश्न आहे. भाजीपाला पिकासाठी एकराला ५० हजार रुपये खर्च असून, दहा हजारही उत्पन्न मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.
बाॅक्स
पाच - दहा रुपये दराने शेतकरी हतबल
धान पट्ट्यात शेतकऱ्यांना भाजीपाला पीक घेण्यासाठी कृषी विभाग उत्साहीत करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी माेठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवत आहे. मात्र, दराची काेणतीही हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बळी जात आहे. अनेक शेतकरी वेळप्रसंगी कर्ज घेऊन बागायती शेती करीत आहेत. परंतु पाच - दहा रुपयांच्या पुढे भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
काेट
माेठ्या बाजारपेठेतही भाज्यांचे दर काेसळले आहेत. दाेडका, काकडी, लवकी, चवळी, भेंडी दाेन ते तीन रुपये किलाे दराने विक्री हाेत नसल्याचे चित्र आहे. मात्र, भंडारा येथील बीटीबी सब्जीमंडी शेतकऱ्यांच्या मालाला याेग्य भाव देत आहे. शेतकऱ्यांचा माल राज्य आणि राज्याबाहेर निर्यात करून किमान पाच रुपये दर देत आहे. काेणत्याही शेतकऱ्याचा भाजीपाला मंडीतून परत पाठविला नाही.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा