पालांदूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून शेती खर्चात वाढ होत आहे. खर्चात बचत करण्याच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी घरातीलच बियाणे बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी यासाठी लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नवनवे बदल प्रात्यक्षिकातून पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५२ गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. यासाठी पालांदूरचे मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे, मुकुंद खराबे, कृषी सहायक वैशाली खांदाडे आदींनी शेतकऱ्यांना शेतात भेट देऊन प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर कोरोनातही शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे धडे देत आहेत. संपूर्ण राज्यभरात १ जून ते ५ जून या काळात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उगवणक्षमता तपासणीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. याकरिता पालांदूर मंडळ कृषी कार्यालयाची चमू शेतकऱ्यांच्या मार्गदर्शना करीत आहे. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून यातून उत्पन्न वाढीकरिता मोठी मदत झालेली आहे. बियाणाच्या वाढत्या किमती, बोगस बियाणाचे परिणाम बघता, शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावेत असा आग्रह धरला जात आहे. याकरिता कृषी विभागाने स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांकरिता सुरू केलेला आहे.
वाकल येथे सरपंच टिकाराम तरारे व गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे यांनी दाखवले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत समाधान करण्यात आले. घरचेच बियाणे वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच टिकाराम तरारे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्यास सांगितले.
पालांदुरात मळू कापसे यांचे घरी गणपती पांडेगावकर, वैशाली खांदाडे, मुकुंद खराबे यांनी शेतकऱ्याला बीज प्रक्रियेसह उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक दाखविले.
बॉक्स
महागाईच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्याला वाचवण्याकरिता सर्व उपायोजनांचे मार्गदर्शन केले जात आहे. बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणीत सरासरी ८० टक्केच्या पुढे बियाणाची उगवण क्षमता अत्यावश्यक आहे. पूर्वी घरातीलच बियाणे वापरले जायचे. कृषी विभागाच्या माध्यमातून खते बचत व बीजप्रक्रिया मार्गदर्शन राबवले जात आहे.