मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : दरवर्षी मेंढपाळ शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात दाखल होतात. मेंढ्यांसह ते पायीच प्रवास करतात. परंतु शेकडो किलोमीटरचा प्रवास करताना महिला, लहान मुले व मेंढ्यांचे लहान पिल्लू यांच्या वाहतुकीकरिता गुजरातच्या मेंढपाळांनी जिल्ह्यातील बैल व बंडी खरेदी केली आहे. येथील बैलबंडीने गुजरातच्या मेंढपाळाला भुरळ घातल्याचे दिसत आहे.
हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात राजस्थान व गुजरातचे मेंढपाळ भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यात दाखल होतात. मेंढ्यांना लागणारा चारा व पाणी विदर्भ, भंडारा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात मिळतो. गत अनेक वर्षांपासून राजस्थानचे मेंढपाळ येथे नियमित दाखल होतात. मागील काही वर्षांपासून गुजरातच्या भुज व कच्छ प्रांतातील मेंढपाळ भंडारा जिल्ह्यात दाखल होत आहेत.
गुजरातच्या मेंढपाळांनी वाहतुकीकरिता येथील बैल व बंडी वाहतुकीकरिता उपयोगात आणली आहे. त्यामुळे त्यांचा शेकडो किलोमीटरचा प्रवास हा जलद होण्यास मदत मिळत आहे. लहान मुले, महिला व जीवनोपयोगी साहित्याची वाहतूक करण्याकरिता बैलबंडीचा उपयोग केला जात आहे. बैलबंडीच्या वाहतुकीमुळे प्रवास सुखकर होतो, असे मेंढपाळाने सांगितले.
वाळवंटातील जहाज असलेल्या उंटाने प्रवास करणे खर्चिक असून अधिक वेळ लागतो. काही प्रमाणात उंटही आमच्या सोबतीला राहतात. गुजरातच्या भुज व कच्छ प्रांतात मेंढपाळ व्यवसाय मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवसायात पूर्वी इतका नफा नसून जुने व्यावसायिकच मेंढपाळ व्यवसाय करीत आहेत. नवीन पिढी या व्यवसायाकडे वळण्यास तयार नाही. आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे गुजरात राज्यात युवकांचा कल हा नोकरी-व्यवसायाकडे आहे. कालांतराने हा व्यवसाय बंद होण्याची भीतीही मेंढपाळांनी व्यक्त केली.
राजस्थान व गुजरात राज्यात उन्हाळ्यात पाणी व चारा मेंढ्यांना हवा तितका मिळत नाही त्यामुळेच आम्ही स्थलांतर करतो अशी माहिती मेंढपाळाने दिली. वाहतुकीकरिता आम्ही भंडारा जिल्ह्यातून बैल व बंडी खरेदी केली. बैलबंडीने प्रवास हा जलद व सुखकारक होतो. या बैलबंडीतून आम्ही मेंढीचे लहान पिल्लू आमच्या कुटुंबातील महिला व लहान मुले प्रवास करतात.
- करम सिंग, मेंढपाळ, भुज (गुजरात)