लाखनी तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामाचे उन्हाळी धान पीक लावले होते. धान पीक जोमात बहरुन आले होते. धान कापणीला सुरुवात झाली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे कापणीच्या एक दिवस अगोदरच वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतात डौलात उभे असलेले धान पीक भुईसपाट झाले. तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकांच्या सुरक्षिततेसाठी शेडनेटची उभारणी केलेली असून या शेडनेटचे ही नुकसान झाले आहे. यात मिरची, टाेमाॅटाे, वांगे, भेंडी, कारले, झेंडू यासारख्या महागड्या पिकांची लागवड केलेली आहे. परंतु अचानक विजेच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. लाखनी तालुक्यातील व पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची धान पिकांचे व शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेडनेट फाटले असून गारांचा खच शेतांमध्ये पडला होता. महागडी असलेली नेट फाटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. धान पीक लोंबी विरहीत झाले असून कापणी योग्य ही राहिले नाहीत.
लाखनी तालुक्यातील खराशी,गुरढा, कनेरी, जेवनाळा, केसलवाडा/वाघ, गोंडेगाव, इसापूर आदी गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या धान पिकाची व आपल्या शेडनेटमध्ये कारले आणि टोमॅटो या पिकाची लागवड केली होती. परंतु अचानक आलेल्या गारपीट व पावसाने धान पीक जमीनदोस्त व शेडनेट फाटून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
बॉक्स
लाखनी तालुक्यातील अन्य गावातही जोरदार गारांचा पाऊस झाल्यामुळे धान पिकांसह गहू, मका, कारली, टाेमाॅटाे, आंबा आदी फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील पालांदूर परिसरात गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोट
‘खरीप धान पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी धान पिकाकडे लागल्या होत्या. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी धान पिकाचे खूपच नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे सर्व्हे आणि पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी’.
जितेंद्र बोंद्रे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लाखनी.