भंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर भंडारा, साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यांतील काही भागात गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात तीन ते चार मिनीट तुरीच्या आकाराएवढ्या गारांसह अर्धा तास पाऊस बरसला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला.
मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला. यावेळी भंडारा शहराच्या काही भागात तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. यासाेबतच साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. गारांचाही वर्षाव झाला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजता वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात रबी पीकांचे माेठे नुकसान झाले. शेतात उभी असलेली पिके जमिनीवर आडवी झाली तर कापणी झालेला चना, वटाणा, गहू, तूर, लाख, लाखाेरी आदी रबी पिकांसह कडपा ओल्या झाल्या. साधारणत: एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची झाेप उडाली. रबी पिकांचे चुरणे थांबले. गुरांचा चारा ओला झाला. त्यामुळे ताे काळा पडणार आहे. काही शेतकऱ्यांनी धानाचे पाेते रचून ठेवले हाेते. तेही ओले झाले. भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात वादळीवाऱ्यासह दुपारी २ वाजेच्या सुमारास जाेरदार हजेरी लावली.
बाॅक्स
शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट
गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला अतिवृष्टीनंतर महापूर आणि धान काढणीच्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून माेठी आशा आहे. उन्हाळी धानासह गहू, हरभरा, लाखाेरीतूर आदी पिकांची पेणी करण्यात आली. मात्र गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. कापणी झालेले पीक ओले हाेत असून आधारभूत खरेदी केंद्राबाहेरील धानही ओले हाेत आहे.