भंडारा : गत पाच दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरोना संकटात दिलासा देण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केले असले तरी तत्काळ मदत देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील लाखनी, साकोली, मोहाडी, भंडारा, तुमसर आदी तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हाताशी आलेला धान यात उद्ध्वस्त झाला. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणेने तत्काळ मदत देण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने सर्वेक्षण करुन अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. यासोबतच वादळात अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. लाखनी, लाखांदूर तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे. या नुकसानग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र सध्या प्रशासन कोरोना संसर्ग निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मदत केव्हा मिळेल असा प्रश्न आहे.