भंडारा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीचा तडाखा बसला असून रब्बी पिकांसह बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुका महसूल विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले. सर्वात जास्त गारपिट पवनी तालुक्यात झाली आहे. गत दोन दिवसांपासून पाऊस येत असल्याने वातावरणात गारवा अधिकच वाढल्याने थंडीतही वाढ झाली आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक वातावरणात बदल झाल्याने गारपीट होऊन पाऊस पडला. तर, आजही पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. लाखांदूर तालुक्यात ११४.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गारपिटीसह पावसाने रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान, पिकांचे पोते पावसात सापडले. गत दोन दिवसांपासून पाऊस येत असल्याने वातावरणात गारवा अधिकच वाढल्याने थंडीतही वाढ झाली आहे. मंगळवारी झालेल्या गारपिटीची तालुका महसूल विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.