रिक्त पदे भरणार काय?: शासननिर्णयाला केराची टोपली पालांदूर : जिल्ह्यात बऱ्याच शाळेत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. शासन जागा भरण्यासंबंधी वेळ काढू धोरण आखत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता तात्पुरता पर्याय म्हणून घड्याळी तासिका शिक्षकांची मदत घेण्यात आली. यांना मिळणारा मेहनतनामा शासननिर्णयानुसार उच्च माध्यमिक स्तरावर ७२ रु. तर माध्यमिक स्तरावर ५४ रु. ठरला असताना जि.प. भंडारा आणि माध्यमिक स्तरावरचा मेहनतनामा दरमहा ३००० रुपये इतका केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याला वाचा फोडल्याकरिता लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करावी अशीही मागणी केली आहे.जि.प. भंडारा अंतर्गत जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मागील ५ ते ७ वर्षापासून कित्येक अनुदानित तुकड्यांवर शिक्षकच नाहीत. तेव्हा जि.प. भंडारा व जि.प. शिक्षक संघटनांनी शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता काटकसरीच्या धोरणानुसार कमी मोबदल्यात शैक्षणिक पात्रता असलेल्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची घड्याळी तासिका शिक्षक म्हणून नियुक्ती केली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन क्र. एसएसएन २१०३/(११३/०३)/माशि-२, दि. २७ नोव्हें. २००६ नुसार उच्च माध्यमिक शिक्षकांना ७२ रु. व माध्यमिक शिक्षकांकरिता ५४ रु. घड्याळी तासिका शिक्षकांचे वेतन निश्चित केले गेले. आवश्यकता भासल्यास आठमाही सुधारित अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्याची शिफारस पाचव्या वेतन आयोगानुसार ठरले असताना यावर्षी जि.प. भंडारा पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहमतीने शासननिर्णयाला बगल देत उच्च माध्यमिकच्या शिक्षकांना मानधन कायम ठेवला तर माध्यमिक घड्याळी तासिका शिक्षकांना प्रतिमाह ३००० रु. इतकाच केल्याने नैराश्य वाढले आहे. शेतात कम करणाऱ्या मजुरापेक्षाही कमी मजुरी मिळणे म्हणजे त्यांच्या बेरोजगारीची चेष्टा करणे होय. आज जिल्ह्यात ५० ते ६० घड्याळ तासिका शिक्षक काम करीत आहेत. महागाई रोजच वाढत असताना त्यांचे मानधन कमी करणे योग्य नाही. तेव्हा मायबाप जि.प. भंडारा यांनी शासननिर्णयानुसार मानधन देण्याची मागणी पूर्ण करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
घड्याळी तासिका शिक्षकांना मिळतेय निम्मे मानधन
By admin | Published: September 21, 2015 12:27 AM