भंडारा : तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील रनिंग हातभट्टीवर पोलिसांनी धाड मारुन दारु गाळण्याच्या साहित्यासह १ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तुमसर तालुक्यातील डोंगरला नाला आणि मोहाडी तालुक्यातील सोनुली नाल्यावर कारवाई केली.
आकाश प्रकाश डोंगरे (२६) रा.रविदास वाॅर्ड तुमसर आणि नितेश उर्फ बंटी साधू मेश्राम (३४) रा.नेहरु वाॅर्ड वरठी अशी दारु गाळणाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पथकाने ही धाड मारली. डोंगरला येथील नाल्यावर टाकलेल्या धाडीत ४२ प्लास्टीक पिशव्यांमध्ये प्रत्येकी १० किलो याप्रमाणे ६३० किलो सडवा, ड्रम आदी साहित्य जप्त करण्यात आले. तर वरठी ठाण्याच्या हद्दीत सोनुली येथे १० प्लास्टीक ड्रममध्ये प्रत्येकी ६० किलो याप्रमाणे ६०० किलो मोहामाच व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे दारु गाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.