भंडारा : जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गत नऊ महिन्यांत ८८ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विशेषतः चोरट्यांची नजर सार्वजनिक ठिकाणांवर असून, चौक परिसर हा त्यांचा चोरीचा मुख्य अड्डा बनला आहे. भंडारा शहरातील शास्त्रीनगर चौक, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक व बसस्थानक परिसर दुचाकी चोरांचा अड्डा बनला आहे.
दुचाकी चोरणारे गुन्हेगार भंडारा जिल्ह्याला लागून असलेले नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधून येत असतात. चोरी करून ते तिथून पोबारा करतात. अशावेळी जिल्हा पोलिसांनी या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तरीही दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने असे हॉटस्पॉट ठरवून त्या रस्त्यांवर नजर ठेवण्याचे कामही सुरू केले आहे.
बॉक्स
या भागात सर्वाधिक धोका
बसस्थानक : भंडारा शहरातील बसस्थानक हे चोरट्यांसाठी मोठे फायदेशीर स्थळ आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी नातेवाइकांना सोडण्यासाठी येत असतात. अप-डाऊन करणारे कर्मचारी येथेच दुचाकी ठेवत असतात.
राजीव गांधी चौक : भंडारा शहरातील अत्यंत वर्दळीचे स्थळ म्हणून राजीव गांधी चौकाची ओळख झाली आहे. महत्त्वपूर्ण प्रतिष्ठाने व कार्यालये असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी असतात. याचा फायदा चोरटे उचलतात.
गांधी चौक : शहरातील सर्वांत जुना चौक असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाहेरून येणारे चोरटे या परिसरात नजर ठेवून असतात. संधी साधून ते दुचाकी घेऊन पळ काढतात.
शास्त्रीनगर : शास्त्रीनगर परिसर सर्वांत मोठा असून, रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकी अलगद चोरून नेल्या जातात. बाहेरून विशेषतः बायपास रस्त्यावर हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. येथेही पोलिसांची विशेष स्थानिक गुन्हे शाखेचे करडी नजर आहे.
बॉक्स
आतापर्यंत २५ गुन्हे उघड
जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात एकूण ८८ मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी २६ गुन्हे उघडकीला आले आहेत. त्यात एकूण ३० जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरितांचा शोध घेण्यात येत आहे. विशेषतः बाहेर जिल्ह्यांतील ४६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीला आणले आहेत. त्यापैकी चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १३ लाख ४३ हजार रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
कोट बॉक्स
घटनांकडे विशेष लक्ष
ज्या ठिकाणावरून वारंवार दुचाकी चोरी होत आहेत, त्याठिकाणी सापळा रचून किंवा देखरेख ठेवली जात आहे. गुन्हे घडणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
-वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.