नागनदीच्या दूषित पाण्याचा पुरवठा : वैनगंगा नदीला आले गटाराचे स्वरुप, नागरिकांसह जनावरांचे आयुर्मान धोक्यातभंडारा : नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांना पिण्यासाठी तसेच शेतीला सिंचनासाठी जलपुरवठा होतो. त्यामुळे नदीला जीवनदायीनी असे संबोधल्या जाते. मात्र, भंडाऱ्याची वैनगंगा नदी ही आता नागरिकांच्या आरोग्यावर उठली आहे. नागनदीचे लाखो लिटर दूषित पाणी वैनगंगेत सोडण्यात येत असल्याने ते दररोज सुमारे २ लाख नागरिक पितात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात पवनी तालुक्यात गोसीखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणामुळे वैनगंगा नदीचे प्रवाहित पाणी सन २०१४-१५ पासून अडविण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था होत असली तरी अनेक नागरिकांना हेच धरण शाप ठरले आहे. वैनगंगा नदीकाठावर सुमारे २० ते २५ गावे वसलेली आहेत. यात गणेशपूर, पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, साहुली, पिपरी, सावरी, जवाहरनगर, कोंढी, राजेदहेगाव, पेवठा, भंडारा, कारधा यासह अनेक गावांचा समावेश आहे. नागपूर येथील नाग नदीच्या प्रवाहातून वैनगंगा नदीला दररोज लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेवठा या गावाजवळ नाग नदी वैनगंगा नदीला मिळते. त्या माध्यमातूनच नागपूर येथील मलमुत्र, रासायनिक व जैविक घटकांचा समावेश असलेले व आरोग्यास अत्यंत हानीकारक असे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना चर्मरोगाच्या आजारासह अन्य रोगांची लागण होत असल्याचे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.गोसे धरणाच्या बांधकामानंतर वैनगंगा नदीचे पाणी अडविण्यात आले असल्याने तेव्हापासून नाग नदीतून येणाऱ्या दूषित पाण्याच्या साठ्यामुळे ही नदी आता गटाराचे स्वरुप धारण करीत आहे. अत्यंत दूषित असलेल्या या पाण्याचा जनावरेही पिण्यासाठी वापर करीत नाही. असे घाण पाणी नदीकाठावरील गावातील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळजोडणीधारक नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. यामुळे दररोज लाखो लिटर दूषित पाणी सुमारे दोन लाखांच्या वरील नागरिकांच्या पोटात जात असल्यामुळे हा ‘विषाचा प्याला’ प्रत्येक घरात, प्रत्येक नागरिकांच्या हातात दिसून येतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावरे व जंगली प्राणीही प्रभावित झाली आहे. नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे आवाज उठविला. मात्र नाग नदीच्या दूषित पाण्याचा प्रवाह बंद करण्यास प्रशासनाने अद्याप सहकार्य केलेले नाही. (शहर प्रतिनिधी)जलशुद्धीकरण यंत्राची आवश्यकतावैनगंगा नदीकाठावर अनेक गावे वसलेली असून येथील नागरिकांना होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा थेट गावाच्या पाण्याच्या टाकीतून पोहचतो. तेथून सरळ नळजोडणीधारकांना पुरवठा होत आहे. मात्र ज्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने नागरिकांना ते दूषित रासायनिक व मलमुत्रयुक्त पाणी मागील अनेक वर्षांपासून नाईलाजाने प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे भविष्यात अनेक व्याध्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. प्रशासनाची भूमिका संशयास्पदएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदींचे पुनरूज्जीवन व सफाईवर भर दिला आहे. असे असताना भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीत लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग होत असताना प्रशासन अद्यापही निद्रीस्त आहे. लाखो लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले असताना प्रशासनाने याबाबत कुठलेही ठोस पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
दोन लाख नागरिकांच्या हातात ‘विषाचा प्याला’
By admin | Published: April 17, 2017 12:30 AM