तलावात खड्डा खोदून पाणी पुरवठा : मॉयल प्रशासन व चिखला ग्रामस्थांचा पुढाकारमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भीषण उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मनुष्य तथा वन्यप्राणी वणवण भटकत आहे. चिखला गाव टेकड्यांच्या मध्यभागी वसला असून सातपुडा पर्वत रांगातील गावात पाणी समस्या कायम आहे. मंगळवारी पाण्याविना तलावाच्या गाळात फसून हरिणाचा तडफडून मृत्यू झाला. मॉयल प्रशासनासह चिखला ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांकरिता तलावात खड्डा खोदून त्यात दररोज एक टँकर पाणी घालणे सुरू केले आहे. येथे वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता मॉयल प्रशासनासह ग्रामस्थ सरसावले. वनविभागाचे मात्र दुर्लक्ष दिसत आहे.मागील तीन वर्षापासून सातपुडा पर्वत रांगातील अनेक गावात पाऊस कमी पडल्याची शासनदफ्तरी नोंद आहे. चिखला परिसरातील १५ ते २० गावातील तलाव, बोड्या कोरड्या पडल्या आहे. चिखला गावाजवळील सिंधी तलावात पाणी कधीच कमी होत नव्हते. सध्या ते पूर्णत: कोरडे पडले आहे. जंगलव्याप्त परिसरात तलाव असल्याने वन्यप्राणी येथे आपली तृष्णा भागविण्याकरिता येतात. एका आठवड्यापूर्वी सदर तलाव कोरडा पडला.मंगळवारी सकाळच्या सुमारास सिंधी तलावातील चिखलात एका हरणाचा तडफडून मृत्यू झाला. पाण्याच्या शोधात हे हरिण येथे आले होते. हृदय पिळवून टाकणारी ही घटना चिखला ग्रामस्थ तथा मॉयल प्रशासनाला कळली. अनेकांनी तलावाकडे धाव घेतली. नंतर तलावात खड्डा खोदून पाणी घालण्याची संकल्पना पुढे आली. चिखल्याचे सरपंच दिलीप सोनवाने तथा मॉयल प्रशासनाने येथे खड्डा खोदण्याची तयारी दर्शविली. याची माहिती तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार बालपांडे, नायब तहसीलदार एन. पी. गौंड, मोहतुरे, स्थानिक तलाठी कदम यांच्या निर्देशानुसार तलावात खड्डा खोदत चिखल बाहेर काढण्याकरिता जेसीबी मशीन बोलाविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलावाला भेट दिली.चिखला मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी भट्टाचार्य, खाण प्रबंधक अमीन, रहांगडाले, चालक सार्वे, संजय मसराम पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. मॉईल, महसूल, चिखला ग्रामस्थांनी येथे पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे वनविभागाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वनविभागाचे येथे दुर्लक्ष दिसत असून केवळ कागदोपत्री प्राणी सुरक्षित दाखविण्यात येत आहे.चिखला शिवारात दररोज वाघ, चिता, भालू, मोर, हरण, सांबर, चितळ, ससे, रानडुक्कर, माकडे तथा अन्य पक्षी येथे दररोज तृष्णा भागविण्याकरिता येतात. परंतु वनविभागाने तलाव कोरडा पडल्यानंतरही दखल घेतली नाही. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात कृत्रिम पानवठे केवळ दोनच आहेत हे विशेष. ४० पेक्षा जास्त वनविभागाचे कर्मचारी येथे कार्यरत आहेत. जंगलासह प्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. पाण्याविना वन्यप्राण्यांचा मृत्यूबद्दल त्यांना विचारणा करण्याची गरज आहे. केवळ कागदी कागदपत्रांपुरतीच वनविभाग आहे काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.
वन्यप्राण्यांसाठी सरसावले हात
By admin | Published: May 31, 2017 12:41 AM