नाना पटोले यांचे प्रतिपादन : खेडुले कुणबी समाज मेळाव्यात गुणवंत, नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार लाखांदूर : आपल्या पूर्वजांनी दिलेली ओळख व सध्याची समाज व्यवस्था आपण सर्वजण पुढे रेटत आहोत. भारतीय संविधानात या समाजाच्या उत्कर्षासाठी जी तरतूद करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना कर्तव्य समजले पाहिजे. असे सांगून कुणबी समाजात जन्म घेऊन धन्य झालो, अशी कृतज्ञता खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.लाखांदूर येथे रविवारला अखिल खेडुले कुणबी समाजाच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर साकोलीचे आमदार बाळा काशिवार, प्रा.संजय कुथे, रामभाऊ दिवटे, रामकृष्ण ठेंगडी, अभय शिंगाडे, ईश्वर घोरमोडे, मुख्याध्यापक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक पारधी, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप बुराडे, सभापती मंगला बगमारे, वासुदेव तोंडरे, रामचंद्र राऊत, ताराचंद मातेरे उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, देशातील प्रत्येक प्रांतात कुणबी समाज आहे. देशात ७५ खासदार कुणबी समाजाचे आहेत. ७ खासदार तेली समाजाचे आहेत. ज्या समाजाचे सात खासदार त्यांचा पंतप्रधान झाला. मात्र ७५ खासदारांचे केवळ दोन मंत्री झाल्याची व्यथा मांडली. पिढ्यानपिढ्यांपासून मागासलेल्या ओबीसीतील कुणबी समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास व्हावा, म्हणून भारतीय संविधानात तरतूद आहे. मात्र राज्यकर्त्यांनी ७० टक्के समाज असून आवश्यक अंमलबजावणी केली नाही. ६८ वर्षांपासून हा समाज विकासापासून कोसो दूर ठेवण्याचे काम या देशातील मुठभर लोकांनी केल्याचा आरोप केला. या समाजातील प्रत्येकजण शिक्षित होऊन दिशा व दशा समजण्यापूर्वीच बहुजन समाजात तेढ निर्माण करून मुठभर लोक मोठी झाली. अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे लढा दिला पाहिजे. दरम्यान या समाजाचा मागासलेपणा दूर करावयाचा असेल तर संघटीतपणे वाटा बलुतेदार समाज व्यवस्था झुगारणे काळाची गरज असल्याचे म्हटले. मुठभर लोकांच्या दडपशाही धोरणाला बळी पडलेल्या या समाजाचे स्वतंत्र मंत्रालयाची मागणी अनेक वर्षापासून रेटत आहे. ही लढाई ओबीसीतील कुणबी समाजापुरती न राहता बहुजनांची लढाई झाली पाहिजे असे आवाहनही केले. यावेळी खा.पटोलेंच्या हस्ते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्यांचा समाजातर्फे सत्कार केला. संचालन रामचंद्र राऊत यांनी केले. या मेळाव्याला महिला पुरुष उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
ओबीसीतील कुणबी समाजात जन्म घेऊन धन्य झालो
By admin | Published: November 23, 2015 12:37 AM