साकोली (भंडारा) : हातआरी टोळीकडून मौल्यवान सागवानासह विविध प्रजातींच्या वृक्षांची कत्तल करून आरामशीन संचालकांच्या संगनमताने विक्री करण्याचा गोरखधंदा गत काही वर्षापासून साकोली व लाखनी वनपरिक्षेत्रात सुरू आहे. वनाधिकाऱ्यांच्या मॅनेज प्रवृत्तीतून हा प्रकार खुले आम सुरू असून कोट्यवधींची उलाढाल यातून केली जाते.
साकोली व लाखनी वनपरिक्षेत्रातील जंगलात मोठ्या प्रमाणात मौल्यवान वृक्ष आहेत. या वृक्षांवार आता तस्करांची नजर गेली असून स्थानिक हातआरी टोळीच्या माध्यमातून रात्री जंगलातून वृक्ष कापून आणले जातात. या मुख्यतः सागवान व बीजाच्या लाकडाचा समावेश आहे. मूल्यवान लाकडाचे तुकडे पाडून आरामशीनवर आणण्यात येते. आरामशीनवर असलेल्या लाकडात मिसळून विक्री करण्यात येते. हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू असून यात वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी आरामशीन संचालकांना संरक्षण देत असल्याची माहिती आहे.
परिपक्व वृक्षाची दहा वर्षांनंतर कटाई करून लिलाव करण्यात येतो. नवीन लागवडीसाठी कोट्यवधी रुपये वन विभागाच्या माध्यमातून खर्च करण्यात येतात. प्रत्येक वर्षी नवीन प्लांटेशनच्या नावावर कोट्यावधी रुपये खर्च होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वन विभागाला होत असलेल्या उत्पादनाची निष्पक्ष समीक्षा केल्यास बराच गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण परिसरातील या आरामशीन संचालकांवर नसल्याने जंगलच असुरक्षित झाले आहे.
मागणीनुसार कत्तल
पापडा, सानगडी, जांभळी, मोहघाटा, किटाडी, निलागोंदी, उमरझरी, पीटेझरी, कोसमतोंडी जंगल परिसरातून वेगवेगळ्या हात आऱ्याच्या टोळींकडून मागणीनुसार वेगवेगळ्या प्रजातींल्या वृक्षांची कत्तल केली जाते. एका ट्रांजिस्ट पासवर अनेक लाकडे विक्री करणे व त्यातून लाखो रुपयाची उलाढाल करणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. आरामशीन संचालकांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
साईज द्या आणि लाकूड घ्या अशी व्यवस्था
एफडीसीएम व राखीव वनक्षेत्राच्या सराटी, मोहघाटा, बरडकिनी, चिचगाव, गुढरी, किटाडी, महालगाव, नीलागोंदी, घानोड, सोनेगाव, चांदोरी, उसगांव, तुडमापूरी, खांबा, वडेगाव, उमरझरी, कोसमतोंडी, सातलवाडा, चारगाव, झाडगाव, पापडा, सिरेगावटोला, केसलवाडा, इत्यादी ठिकाणावरून हात आऱ्याच्या टोळीकडून कापण्यात येत आहे. जंगलाच्या ऱ्हस होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास बदलून गावाकडे धाव घेत आहे. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घर बांधकामासाठी लागणारे लाकूड सहज उपलब्ध होत असल्याने साईज द्या आणि लाकूड घ्या, अशी व्यवस्था लाकूड तस्करांनी केली आहे.