पोलिसांचे दुर्लक्ष : अड्डे बंद न झाल्यास आंदोलनभंडारा : जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारासारख्या शांत शहरात शाळकरी मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य वाढू लागली आहेत. गांजाच्या आहारी गेलेल्या विशीतील या तरुणांनी प्रीती पटेल या महिलेचा खून केला. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार यांच्या नेतृत्त्वात संतप्त नागरिकांनी तकीया वॉर्डातील गांजा विक्रीचा अड्डा जाळून खाक केला.यावेळी लांजेवार म्हणाले, शहरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलीस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. आम्ही पोलिसांना ज्या-ज्या ठिकाणी गांजाची विक्री होते, ते ठिकाण सांगण्यात येईल, पोलिसांनी हे अड्डे उध्वस्त केले नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा ईशाराही लांजेवार यांनी दिला. मागील दोन वर्षांपासून शहरात गांजा विकणारी टोळी सक्रीय झाली असून शाळकरी मुलांना त्याची मोफत सवय लावतात. नंतर सवयी लागल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यानंतर ही टोळी गांजा पिणाऱ्यांना घरपोच सेवा देतात. त्यातच चोरीच्या वाम मार्गाला लागतात. पैसे मिळाले नाही तर हिंसक मार्गाकडे वळतात. ही मुले नशेच्या ईतकी आहारी गेलेली आहेत की त्यांना आपण कोण आहोत याचे भानही राहत नाही. त्यामुळे गांजा विक्रीच्या मुळावरच घाव घालण्याची मागणी प्रशांत लांजेवार यांनी केला आहे.सात दिवसाच्या आत गांजा विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा जीतू पटेल, दिनेश गजभिये, अत्थर बेग मिर्झा, बबलू खान, नितेश मोगरे, राजेश चंदेल, विकास निंबार्ते, छोटू रेहपाडे, कृष्णा गोखले, देवा कारेमोरे, राजेश चोपकर यांनी दिला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
संतप्त नागरिकांनी जाळला गांजा विक्रीचा अड्डा
By admin | Published: August 02, 2015 12:45 AM