लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात अनेकांना सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा, कॉफी पिण्याची सवय आहे. सकाळी उठले की, चहा, कॉफीचा कप हातात पडतो. लहान मुलेही मोठ्यांचे बघून सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा घेतात. मात्र, या चहा-कॉफीचे दुष्परिणाम आहेत. उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होतो. चहा, कॉफी पिल्याने अनेकांना ताजेपणा अनुभवास येतो. मात्र, त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ म्हणतात, सकाळी उपाशीपोटी चहा, कॉफी पिणे हानिकारक आहे.
प्रमाण किती असावे?
- दुधात चहा किंवा कॉफी टाकण्याचे प्रमाण कमीच असले पाहिजे. या तुलनेत साखरेचे प्रमाण त्या तुलनेत चालू शकते.
- एकावेळी एक कप चहा किंवा कॉफी पुरेशी ठरते; परंतु अनेकजण जास्त चहा पितात. उपाशीपोटी चहा-कॉफी घेणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. यामुळे भूक न लागणे व अपचन यांसारखे त्रास उद्भवतात.
सकाळी दूध, फळे सर्वोत्तम डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपाशीपोटी चहा व कॉफी घेऊ नये, यापेक्षा दूध व फळे घेतल्यास उत्तम होईल. चहा किंवा कॉफी घेणे शक्यतो टाळावे. हे शक्य नसेल तर हे पेय नाश्त्यानंतर घ्यावेत.
चहा व कॉफीचे दुष्परिणाम काय? चहा आणि कॉफी या दोन्हींचे दूरदर्शी विपरीत परिणाम असतात. वारंवार उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर पचनक्रिया मंदावते. तसेच भूक लागण्याचे प्रमाण कमी होत राहते. अनेक लोक भूक टाळण्यासाठी चहा पितात. मात्र, यामुळे भूक व आहार आणखी कमी होतो. सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होतो.
"सकाळी उपाशीपोटी चहा व कॉफी न घेता नाश्ता घेतला पाहिजे. त्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. उपाशीपोटी चहा पिणे पूर्वापार सुरू आहे. मात्र, तरुण आणि विशेष करून बालकांनी या पेयापासून दूर राहिले पाहिजे. फक्त सवय म्हणून हे पेय पिणे धोक्याचे आहे. एकवेळ चहा, कॉफी घेणे चालू शकते. मात्र, उपाशीपोटी चहा-कॉफी घेणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. शक्यतो चहा व कॉफी पिणे प्रत्येकाने टाळलेलेच बरे असते. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात." - डॉ. सौरभ रोकडे, पोटविकारतज्ज्ञ, भंडारा