युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असूनही अतिक्रमित जागेच्या कारणावरून घरकुलापासून वंचित ठेवले. चार वर्षे अनेकदा विनवण्या केल्या. मतदानावर बहिष्कार टाकला, अधिकाऱ्यांना निवेदन दिली. त्यावेळी अपमानित केले. परंतु गाव नमुना आठवरील अतिक्रमणाची नोंद हटविली नाही. एकाही गावात असा अन्याय झालेला नाही. आता निवडणुका आहेत, त्यांना व त्यांच्या समर्थकांना घराच्या अंगणातही पाय ठेवू देणार नाही, असा इशारावजा आक्रोश ग्रामीण मतदारांत दिसून येत आहे. लोकांची कामे करणाऱ्यांना निवडून देऊ, असे रोखठोकपणे सांगितले जात आहे. जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासकराज सुरू आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोमात आहेत. उमेदवार निवडीसाठी गट प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली असून सामाजिक, कौटुंबिक व जातीय समीकरणावर आधारित जनाधार असलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. अनेक गटांचे वाॅर्डावाॅर्डातील उमेदवार ठरले असले तरी राखीव जागांवरील उमेदवार शोधताना गट प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत. उमेदवारांच्या शोधासाठी गावप्रमुखांनी अनेक कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मात्र संभाव्य उमेदवार भाव खात असल्याने हिरमोड होत आहे.
सरपंच पदासाठी गटागटात संघर्षयंदा थेट लोकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गटागटांत संघर्षाचे वातावरण आहे. काहींनी वेगळा गट तयार करून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने त्रिकोणी व चौकाेनी लढाई होणार आहे. त्यातही काही वाॅर्डात जाऊ विरूद्ध जाऊ तर भावाविरूद्ध भाऊ, मित्राविरूद्ध मित्र, असे चित्र दिसणार आहे. काहींनी गावात सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, यासाठी उमेदवार मिळत नसल्याचे समर्थकांना सांगून इनीलाच मैदानात उतरविण्याचा पराक्रम इवायाकडून होत आहे.
तरुणांसोबत ज्येष्ठ पुढारीही मैदानात- अनेक निवडणुकांत माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगणारे ज्येष्ठ पुढारीही गटातील तरुण उमेदवारांची संधी नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पटाचा बैल कधी म्हातारा होत नाही, अशी पुष्टीही त्यासाठी जोडली जात आहे.