भंडारा : शहरातील सिव्हील लाईन परिसरासह अनेक भागात मोकाट कुत्त्यांचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ही टोळके दुचाकी जवळुन जात असताना चालकाच्या अंगावर धावुन जातात.
शहरालगतच्या सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गणेशपूर येथेही मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे फिरायला निघालेल्या एका महिलेला या कुत्र्यांनी चावा घेतल्याने महिला जखमी झाली. या कुत्र्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. गणेशपूर ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून भंडारा शहराला लागून आहे. या गावात मोकाट कुत्र्यांमुळे गावात भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपुर्वी पटवारी भवनच्या मागील भागात एक महिला पहाटेच्या सुमारास फिरण्यास निघाली असता मोकाट कुत्र्यांनी तिचा चावा घेतल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीला अनेकदा सांगण्यात आले. परंतु, ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.