प्रगतिशील शेतकरी प्रशांत बालपांडे यांचा अभिनव उपक्रम
जवाहरनगर : ठाणा पेट्रोलपंप येथील प्रगतशील शेतकरी तथा मुख्याध्यापक प्रशांत बालपांडे यांनी आपल्या एस.पी.एन.एफ नैसर्गिक भाजीपाला मॉडेलमध्ये तणनियंत्रणासाठी पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक मल्चिंगचा वापर न करता, धानाच्या तणसाचे काष्ट आच्छादन म्हणून वापर केलेला आहे. त्यामुळे पैशासोबतच पर्यावरणाचेसुद्धा रक्षण झालेले आहे.
प्रशांत बालपांडे हे तीन वर्षांपासून सुभाष पाळेकर नैसर्गिक भात शेती करतात. यावर्षी मात्र त्यांनी एक प्रयोग म्हणून पाच गुंठ्यात एस.पी.एन. एफ नैसर्गिक विषमुक्त भाजीपाला मॉडेल तयार केलेले आहे. त्यात घरी अर्थात स्वतःच्या शेतावर लागणाऱ्या जवळपास तेरा ते पंधरा प्रकारचे भाजीपाला या मॉडेलमध्ये लावण्यात आलेले आहे. यासाठी बाजारातून कोणतेही संकरित बियाणे न वापरता, फक्त देशी बियानाचाच वापर केला गेलेला आहे. या पिकांना देशी गाईच्या शेण, गोमूत्रपासून तयार केलेले, घन जीवामृत जीवामृत आंबट ताक यांच्या वापराने पीक जोमदार वाढीला लागलेले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहे. तरीही यांचे भात पीक नर्सरी (पऱ्हे) पावसाअभावी कुठेही करपलेले नाही. त्याची वाढ कुठेही थांबलेली नाही. याउलट रासायनिक शेतातील भात पिके पावसाअभावी उन्हामुळे सुकण्याच्या अवस्थेत आलेली आहेत. शेतकऱ्यांनीसुद्धा रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन प्रगतीशील शेतकरी व मुख्याध्यापक प्रशांत बालपांडे यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे.