सी.एल. थूल यांचे निर्देश : बारव्हा येथील महिला डॉक्टरला शिवीगाळ बारव्हा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता मालडोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करणारे त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाब कापगते यांना फरार घोषित करावे तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलीस विभागाने शोध मोहीम राबवावी. फिर्यादी आणि साक्षीदाराच्या जिवितास धोका लक्षात घेता त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाची अध्यक्ष सी.एल. थूल यांनी केले.डॉ.सविता मालडोंगरे यांच्या प्रकरणाला १ महिना उलटूनही आरोपी पकडला गेला नाही. या पार्श्वभूमीवर आज आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थूलहे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भंडारा येथील विश्रामगृहात त्यांनी जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता मालडोंगरे यांच्याशी सुद्धा चर्चा करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते.यावेळी थूल म्हणाले, सदर प्रकरणात १ महिना उलटूनही आरोपी पकडल्या गेला नाही. त्यामुळे सदर आरोपीला फरार घोषित करून त्याची मालमत्ता आणि बँक खाते सिल करावे. त्याचबरोबर त्यांचे वेतन थांबविण्यात यावे. श्रीमती मालडोंगरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या वकीलाची नेमणूक करावी. साक्षीदार आणि फिर्यादी यांच्यावर आरोपीकडून दबाव टाकण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी. सदर आरोपीच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी दिली. यावेळी श्रीमती मालडोंगरे यांनी आयोगाच्या अध्यक्षाकडे आरोपीला तात्काळ अटक करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी श्रीमती मालडोंगरे यांना अनुसूचित जाती, जमाती, अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आर्थिक मदतीचा धनादेश थूल यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच मनोधैर्य योजनेतून सुद्धा त्यांना मदत देण्याच्या सूचना थूल यांनी केल्या. (वार्ताहर)
'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक करा
By admin | Published: October 11, 2015 1:55 AM