मृतक १८ वर्षीय तरूण : तीन दिवसानंतर आढळला मृतदेहलोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : सरपणासाठी डोंग्यात बसून नदीपात्रातील काड्या काढत असताना १८ वर्षीय तरूणाचा तोल गेल्याने पाण्यात कोसळला. यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. करण सोपान भुरे (१८) रा. चिचोली (पिपरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना १९ जुलै रोजी घडली असून तरूणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी दुपारी दीड किलोमीटर समोरील नदीपात्रात आढळला. माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मागील चार दिवसांपासुन कन्हान नदी दुधळी भरुन वाहत आहे. सरपणासाठी कड्या गोळा करण्याच्या हेतुने करण हा नदीपात्रात डोंग्याद्वारे आवमारा या घाट परिसरात गेला होता. यात डोंग्यावरून करणचा तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. यात त्याचा बुडून मृत्यू झाला परंतू पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार ऐ. के. नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ जांभुळकर, पोलीस हवालदार मिलिंद जनबंधु, पोलीस नायक सचिन टिचकुले घटनास्थळी दाखल झाले. १९ जुलैपासून करणचा शोध घेणे सुरू होते. आवमारा घाट, पेवठा घाट, चिचोली घाट, पिपरी रेती घाट इत्यादी ठिकाणी शोधकार्य केले. जवाहरनगर पोलीसांच्या सहकार्याने व भंडारा आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधकार्य करीत शुक्रवारी दुपारी करणचा मृतदेह घटनास्थळापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरील नदीपात्रातून बाहेर काढला. नवव्या वर्गापर्यंत शिकलेला करण हा आईकडे राहत होता. आईला हातभार लावावे म्हणून मध्येच शिक्षण सोडून जवाहरनगर परिसरात ठेकेदारीच्या कामावर जात होता. घटनेची नोंद जवाहरनगर पोलीसानी केली असुन तपास संदीप ताराम व बिट अंमलदार एकनाथ जांभूळकर करीत आहे.
डोंग्यातून पडला अन् वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 1:15 AM