वेळोवेळी मदतीचे आश्वासन : तिरोड्याच्या नाभिक संघटनेचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून बसलेल्या, अनाथ झालेल्या त्या चार बहिणींची सात्वंना करुन तिरोडा येथील नाभिक संघटनेच्या वतीने आर्थिक मदत ग्रामस्थांसमोर देण्यात आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील केस कर्तनाचा व्यवसाय करुन आपल्या संसाराचा गाडा चालविणारा अनिल सूर्यवंशी एका-एकी औषधोपचार सुरु असताना मृत्यू पावला. आपल्या मागे ४ मुली व पत्नी ठेवून अनिलने कुटुंबाचा निरोप घेतला. पतीच्या दु:ख वियोगात असतानाच ३६ वर्षीय पत्नी मंगला पतीच्या निधनानंतर तब्बल २५ दिवसांनी आपल्या ४ मुलींना सोडून मृत्यू पावली. जन्मदात्या मायबापाचे मागे-पुढे सोडून जाण्याने त्या ४ बहिणीवर दु:खाचे पहाड कोसळले. त्या अनाथ झालेल्या बहिणींचे सविस्तर वृत्त लोकमतला प्रकाशित करून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. सदर वृत्ताची दखल घेऊन अनेक ठिकाणांहून सामाजिक दानशूर पुढे आले. आजही आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे. त्यातच तिरोडा येथील नाभिक संघटनेने तालुक्यात समाजबांधवाकडून वर्गणी करून समाजातील एका कुटुंबावर मोठा आघात झाल्याने अनाथ झालेल्या त्या बहिणींना भेटून त्यांना आपुलकीचा आधार दिला. आर्थिक मदत देण्यासाठी निमगाव येथे आले व चारही बहिणीची आस्थेनी विचारपूस केली. शाळा शिका, अडचण आल्यास तिरोड्याची नाभिक संघटना वेळोवेळी तुमच्या मदतीला येईल, असा त्यांनी त्या बहिणींना धीर दिला. नाभिक संघटनेच्या वतीने ६ हजार ५०० रुपये चारही बहिणींना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गुरुदेव बारसागडे, राजू येवले, शिवदास बारसागडे, खुशाल बारसागडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिशुपाल पटले, हितेश जांभुळकर, तंमुस अध्यक्ष माधो गायकवाड, पोलीस पाटील संजय कापगते, उमेश सूर्यवंशी, केशवराव पटले, शामराव सूर्यवंशी व भारत सूर्यवंशी व इतर उपस्थित होते.
‘त्या’ अनाथ बहिणींना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:18 AM