लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : घरगुती वादात माहेरी आलेल्या पत्नीसह सासू, साळा आणि साळीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना साकोली तालुक्यातील सानगडी येथे बुधवारी दुपारी घडली. यात चौघे जखमी झाले असून, साळ्याच्या पोटावर चाकूने हल्ला केल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर आरोपी सानगडी येथून पसार झाला. विकास अशोक सोनवाणे (३२) रा. चान्ना कोळका जि. गोंदिया असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी काजल विकास सोनवाणे (२२) रा. चान्ना कोळका, सासू अर्चना महेंद्र मेश्राम (५२), साळा रोहित महेंद्र मेश्राम (१८), साळी प्राची महेंद्र मेश्राम (२०) तिघे रा. सानगडी अशी जखमींची नावे आहेत. गत काही महिन्यापासून विकास आणि काजल यांच्यात घरगुती कारणावरून वाद होता. चार महिन्यापूर्वीपासून ती माहेरीच होती. महिनाभरापूर्वी ती सासरी चन्ना कोळका येथे गेली. दरम्यान, मंगळवारी विकास आणि काजल यांच्यात पुन्हा वाद झाला. बुधवारी सकाळी काजल आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी सानगडी येथे आली. पाठोपाठ दुपारी १ वाजता विकासही सानगडीत पोहोचला. सासऱ्याच्या घरी पत्नीसोबत वाद घालत पत्नीवर चाकूने हल्ला केला. हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासू, अर्चना, साळा रोहित, साळी प्राची यांच्यावरही चाकूने हल्ला केला. पत्नी आणि सासूच्या डोक्यावर व गालावर गंभीर दुखापत झाली, तर साळीच्या डोक्यावर चाकू मारला. साळा रोहितच्या पोटात चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. चौघांवर चाकूहल्ला करून विकास तेथून पसार झाला. चौघांनाही साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोहितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी भंडारा येथे रवाना करण्यात आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती होताच साकोलीचे ठाणेदार दीपेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक डी. आर. कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक बागडे घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी आहे खाजगी शाळेत शिक्षक - चाकू हल्ला करणारा आरोपी विकास सोनवाणे हा एका खाजगी शाळेत कॉन्व्हेंट शिक्षक आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे त्याच्यापुढे कुटुंबांचा गाढा चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातून वाद होत असल्याची माहिती आहे. गत वर्षभरापासून पत्नीसोबत त्याचा वाद सुरू होता. चार महिन्यापुर्वी पत्नी माहेरी आली होती. तीन महिने माहेरी राहून पुन्हा ती सासरी गेली आणि वाद झाला.