तिढा सुटेना : मुख्याध्यापक अतिरिक्त ठरण्याची भीतीभंडारा : संच मान्यतेचे सुधारित निकष शासनाने जाहीर केले आहे. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरविण्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने शनिवारी जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन केले. दिवसेंदिवस मराठी माध्यमांच्या शाळेमधील पटसंख्या रोडावत चालली आहे. असे असताना शाळांमधील गळती प्रमाण थांबण्याचे कार्य करण्याऐवजी किंवा त्यांना संरक्षण करण्याऐवजी अशा शाळा बंद करण्याचा घाट शासनाने रचल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. इयत्ता नववी व दहावीचे वर्ग असलेल्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून दोन वर्गाच्या पटसंख्येवर मुख्याध्यापकांचे पद निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे कित्येक शाळा मुख्याध्यापकाशिवाय राहणार आहेत. तसेच पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची संच मान्यता देण्यात येत असल्याने बहुवर्ग अध्यापनाची पद्धत वापरावी लागणार आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने गाव तिथे शाळा या धोरणानुसार गावखेड्यात शाळा सुरु केल्या आहेत. मात्र या निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याची भीती संघाने व्यक्त केली आहे. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वर्गाला मान्यता मिळणार नसल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या या धोरणाने मुख्याध्यापक व शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचा प्रसंग ओढावणार असल्याने विद्यार्थ्यांवरील शाळाबाह्य होण्याचा प्रसंग ओढवेल. यामुळे शासनाच्या निषेधार्थ जिल्हा परिषद समोर १ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. हे धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजकुमार बालपांडे, जिल्हा सचिव जी.एन. टिचकुले, विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सुमारे शंभरावर मुख्याध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)
मुख्याध्यापक संघाचे धरणे
By admin | Published: September 20, 2015 12:50 AM