लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी गत आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात सात दिवसात ८ हजार ७९५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ७ हजार ५९८ नवे रुग्ण आढळून आले. पाॅझिटिव्हिटीची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली. जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकही भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत गत आठवडाभरापासून दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार व्यक्ती कोरोनावर यशस्वी मात करीत आहेत, तर १००० ते १२०० नवे रुग्ण दाखल होत आहेत. त्यातही केवळ १०० ते दीडशे रुग्णांनाच रुग्णालयात उपचाराची गरज असते. इतर रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करीत असली तरी वाढती रुग्णसंख्या आणि त्यातून वाढणारा ताण यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार होत नसल्याची ओरड आहे. परंतु अलीकडे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह इतर उपचारांची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गत आठवडाभरात जिल्ह्यासाठी दिलासादायक असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याची खरी गरज आहे. मात्र आजही नागरिक रस्त्यावर दिसतात.
जिल्ह्यात १२३८ कोरोनामुक्त, १३६८ नवे रुग्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी १२३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १३६८ नवीन रुग्ण आढळून आले. २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यात रविवारी ४७८५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६७७, मोहाडी ९५, तुमसर १२९, पवनी ९६, लाखनी १४३, साकोली १५८ आणि लाखांदूर तालुक्यात ७० असे १३६८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजार ५३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४५ हजार ३२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले तर ३३ हजार १८६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ७१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी भंडारा तालुक्यात १४, तुमसर २, पवनी ३, साकोली १ आणि लाखांदूर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११ हजार ४१९ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ५४५२, मोहाडी ७१७, तुमसर १३२५, पवनी ९०३, लाखनी १२९१, साकोली ११४१ आणि लाखांदूर तालुक्यातील ५९० व्यक्तींचा समावेश आहे.
सर्वाधिक भंडारा तालुक्यातील रुग्ण बरे जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार १८६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यात सर्वाधिक १३ हजार ८९८ व्यक्ती भंडारा तालुक्यात कोरोनामुक्त झाले आहेत. मोहाडी तालुक्यात २८४२, तुमसर ४१७५, पवनी ३९६५, लाखनी ३५४४, साकोली ३१२६ आणि लाखांदूर १६३६ रुग्णांचा समावेश आहे.
३० ते ६० वयोगटात बाधितांचे प्रमाण अधिक जिल्ह्यात वयोगटानुसार कोरोना बाधितांची आकडेवारी बघितल्यास ३० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. २१ ते ३० वयोगटात ८९६०, ३१ ते ४० वयोगटात ९२७९, ४१ ते ५० वयोगटात ८१७४, ५१ ते ६० वयोगटात ६८२५ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. ० ते १० वयोगटात १४७२, ११ ते २० वयोगटात ४०७०, तर ७१ ते ८० वयोगटात १११९ आणि ८० वर्षांवरील २५४ रुग्णांचा समावेश आहे.पुरुषांपेक्षा बाधित होण्याचे महिलांचे प्रमाण कमी जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ९५३ व्यक्तिंना कोरोनाची लागण झाली आहे. यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. २५ हजार ६७२ पुरुष आणि १८ हजार २८१ महिलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. पुरुषांचे बाधित होण्याचे प्रमाण ५८.४१ टक्के, तर महिलांचे ४१.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे ४३ हजार ९५३ रुग्णांपैकी आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. पुरुषांपेक्षा बाधित होणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते.