भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी गत आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात सात दिवसात ८ हजार ७९५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ७ हजार ५९८ नवे रुग्ण आढळून आले. पाॅझिटिव्हिटीची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली. जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकही भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत गत आठवडाभरापासून दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार व्यक्ती कोरोनावर यशस्वी मात करीत आहेत, तर १००० ते १२०० नवे रुग्ण दाखल होत आहेत. त्यातही केवळ १०० ते दीडशे रुग्णांनाच रुग्णालयात उपचाराची गरज असते. इतर रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करीत असली तरी वाढती रुग्णसंख्या आणि त्यातून वाढणारा ताण यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार होत नसल्याची ओरड आहे. परंतु अलीकडे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडसह इतर उपचारांची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बाॅक्स
महिलांच्या तुलनेत पुरुषच अधिक बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ९५३ व्यक्तिंना कोरोनाची लागण झाली आहे. यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. २५ हजार ६७२ पुरुष आणि १८ हजार २८१ महिलांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. पुरुषांचे बाधित होण्याचे प्रमाण ५८.४१ टक्के, तर महिलांचे ४१.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे ४३ हजार ९५३ रुग्णांपैकी आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
बाॅक्स
३० ते ६० वयोगटात बाधितांचे प्रमाण अधिक
जिल्ह्यात वयोगटानुसार कोरोना बाधितांची आकडेवारी बघितल्यास ३० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण दिसून येतात. २१ ते ३० वयोगटात ८९६०, ३१ ते ४० वयोगटात ९२७९, ४१ ते ५० वयोगटात ८१७४, ५१ ते ६० वयोगटात ६८२५ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. ० ते १० वयोगटात १४७२, ११ ते २० वयोगटात ४०७०, तर ७१ ते ८० वयोगटात १११९ आणि ८० वर्षांवरील २५४ रुग्णांचा समावेश आहे.