१० लोक १० के
साकोली : सायकलमुळे आरोग्य समृद्धी व पर्यावरण संवर्धन होते. सर्वांनी सायकलचा वापर करावा, मी आजही दररोज सायकल चालविते, असे प्रतिपादन साकोलीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. त्या जागतिक सायकल दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगर परिषद साकोलीतर्फे आयोजित सायकल रॅलीवेळी बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार हेमकृष्ण कापगते, प्रभाकर सपाटे, उमेश कठाणे, न. प. उपाध्यक्ष जगन उईके, मनीष कापगते, शैलेश शहारे, पुरुषोत्तम कोटांगले, राजश्री मुंगूलमारे, शैलू बोरकर, डॉ. बोरकर, विजय दुबे, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. नगर परिषद साकोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छतेचे पुजारी कर्मयोगी गाडगे महाराज प्रतिमा पूजन करून हेमकृष्ण कापगते यांच्या हस्ते सायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
सायकल रॅली नगर परिषद साकोलीपासून लाखांदूर रोड मार्ग, हनुमान मंदिर चौक, तलाव आणि प्रबुद्ध चौक, एकता काॅलनी, एकोडी चौक, श्रीनगर कालोनी, बिरसा मुंडा चौक, झेंडा चौक, प्रगती काॅलनी, पंचशील वार्ड, अजित बाबा समाधी ते नगर परिषद कार्यालय या मार्गे काढण्यात आली. गाड्यांच्या अतिवापरामुळे प्रदूषण वाढते, प्रदूषण कमी करण्याकरिता सायकलचा वापर फार आवश्यक आहे. तसेच दररोज सायकल चालविल्याने आरोग्यसुद्धा चांगली राहते, असे मान्यवरांनी सांगितले. यासोबतच कोरोनाबाबत जागृती करण्यात आली. याकरिता मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आदींबाबत सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी नगरपरिषदेचे स्वप्निल हमाने, माने शुभम दृगकर व सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.