भंडारा शहरात प्रत्येक वॉर्डात डेंग्यू, मलेरिया या रोगाचे रुग्ण दिसून येत आहेत. आधीच कोरोना विषाणूमुळे नागरिक धास्तावलेले आहेत. शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. जून व जुलै या महिन्याच्या कालावधीत शहरातील २०० ते २५० व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. त्यात बरेच डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे
कधी पाऊस तर कधी ऊन अशा विषम वातावरणामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून डेंग्यूच्या रुग्णाच्या दवाखान्यात मोठी गर्दी दिसत आहे. साथीच्या तापाने शहरातील नागरिक फणफणत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. वॉर्डा-वॉर्डात रस्त्यावरील खड्डे तुंबलेली नाल्या, गटारे, डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू अथवा मलेरिया आजार होऊ नयेत, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने गटारे नाल्या रोडवरील खड्डे दुरूस्ती करून नाल्या साफ करून फवारणी करण्यात यावे. नाल्या वाहती करण्यात यावे, अन्यथा नगरपरिषद कार्यालयामध्ये रोड, नाल्यांवरचा कचरा घाण आणून टाकू, असा इशारा भंडारेकरांनी नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात संजय मते, नितीन नागदेवे, संजय वाघमारे, नेहाल भुरे, सचिन फाले, जीवन भजनकर, विनोद बाभरे, संदीप मारबते, यशवंत सूर्यवंशी, पुरुषोत्तम नंदुरकर,पृथ्वी तांडेकर, शोभा बावनकर, कल्पना नवखरे, मंगला वाडीभस्मे, निहाल भुरे, देवानंद शेंडे, रामेश्वर भजनकर, किशोर आकरे, फारूक शेख आदी उपस्थित होते.