लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : हृदयविकार आता वयाचे बंधन नाही. अलीकडे ऐन तारुण्यात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी शहरी भागात असणारे प्रमाण आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच सावध होत व्यसन टाळणे हिताचे ठरणारे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार हिताचा ठरणारा आहे.
दरवर्षी हृदयविकारामुळे ३२ टक्के लोकांना जीव गमवावा लागतो. पूर्वी हृदयविकाराचा आजार हा साधारणतः पन्नाशीनंतर येत असे. कुठलाही त्रास न होता झटक्यात मरण येत आहे. हल्ली तिशीतील तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 'रिस्क फॅक्टर ओळखा अन् हृदयविकार टाळा,' असा मौलिक सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यापूर्वी हा आजार शहरी भागापुरताच मर्यादित होता; परंतु ग्रामीण भागातही या आजाराचे प्रमाण वाढले आहे.
भविष्यात असंसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ या आजाराची होईल. यामध्ये कॅन्सर, हृदयविकार, हायपरटेन्शन तथा मधुमेह आदी आजारांचा समावेश राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृत्यूचे मोस्ट कॉमन कॉझ हे हृदयविकार आहे. लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांना कुठलेच व्यसन नाही किंवा जे शाकाहारी आहेत, त्यांच्यात व्हिटॅमिन १२ ची कमतरता आढळते. त्यामुळे होमोसिस्टिल होऊन हृदयविकाराची शक्यता बळावते, असे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितले. सावधानता अतिशय गरजेची आहे.
पन्नाशीनंतर दोन तपासणी गरजेची नागरिकांनो, रिस्क फॅक्टर ओळखा. हृदयाशी निगडित काही लक्षणे आढळल्यावर वेळेवर उपचार घ्या. टाइम इज मसल्स असे डॉक्टर म्हणतात. त्यामुळे वेळेचे भान ठेवून निर्णय घेतला पाहिजे.हृदयविकाराची समस्या आल्यास ६० मिनिटांच्या आत उपचार झाल्यास निश्चितच रुग्णाचे प्राण वाचतात. त्यामुळे वयाच्या ४० वर्षांपर्यंत दोन वर्षांतून एकदा डको व टीएमटी करणे गरजेचे आहे. वयाच्या पन्नाशीनंतर वर्षातून एकदा ही चाचणी करावी, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अशी आहेत हृदयविकाराची कारणे हृदयविकाराला तंबाखूचे सेवन घातक आहे. अलीकडे युवकांमध्ये हे प्रमाण अधिक वाढले आहे. अंग मेहनत करण्याचा आळसही याला कारणीभूत आहे. नेहमीच्या जीवनशैलीत काही बदल आल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावाः मात्र युवकांकडून अॅसिडिटीच्या नावाखाली त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रकृती थोडीच बिघडली, असा विचार करूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.
"अलीकडे व्यसनाधीनता वाढली आहे. झोपेचा अभाव, ताणतणावामुळे हृदयविकाराचा धोका संभवत आहे. धोका टाळण्यासाठी नैसर्गिक फलाहार करावा, ऑडली पदार्थ कमी खावे, नियमित व्यायाम करावा, खाण्यावर नियंत्रण ठेवावे. हृदयासंबंधी काही समस्या लक्षात येताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा." - डॉ. प्रफुल्ल नंदेश्वर, हृदयरोग तज्ज्ञ, भंडारा.