मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाची सुविधा पुरविण्याच्या दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या काळात प्रवासी गाडी उशिरा येणे व तांत्रिक कारणामुळे रेल्वे रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊन मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या नेहमीच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक येथे कोलमडते. रेल्वे प्रशासन जरी हायटेक होत असली तरी किमान प्रवासी गाडी वेळेवर येण्याची गरज आहे. नागपूर विभागात बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ २४ ऑक्टोबर रोजी मालगाडी रेल्वे ट्रॅक वरून खाली उतरली होती. ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात तांत्रिक कारणामुळे एक्सप्रेससह इतर पॅसेंजर रेल्वे उशिरा धावत होत्या. भंडारा रोड आणि तुमसर रोड स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायम मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच जवळपास ३६ सुपरफास्ट गाड्यांना येथे थांबा नाही. प्रवाशांना नागपूर किंवा गोंदियाला जावे लागते. तेथे ताटकळत बसावे लागते.
महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द- बडनेरा जवळ मालगाडी रेल्वे रुळा वरून खाली उतरल्याने एक्सप्रेस गाड्यांना त्याच्या अधिक फटका बसला. गोंदियावरून कोल्हापूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली होती. तर इतर प्रवासी गाड्या उशिरा धावल्या. प्रवाशांना वेळेवर घरी जाता आला नाही.
एक्सप्रेस गाड्या लेटमुंबई हावडा रेल्वे मार्ग हा दक्षिण पूर्व रेल्वेच्या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग मानला जातो रेल्वे प्रशासनाला या विभागात मोठा आर्थिक फायदा होतो. तर दुसरीकडे या मार्गावरील कुर्ला हावडा ही एक्सप्रेस गाडी लेट राहते. कधी कधी ही गाडी सुमारे दोन ते तीन तास उशिरा धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदियावरून सुटते. नागपूरनंतर ही गाडी उशिरा धावत असल्याचे प्रवासी सांगत असतात.
या मार्गांवर प्रवाशांचे हाल
- नागपूर ते गोंदिया दरम्यान काही पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या तर काही अद्यापही बंद आहेत. कोरोना नंतर या मार्गावर रेल्वे प्रशासनाने पूर्ण क्षमतेने लोकल गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. तसेच तुमसर ति रोडी दरम्यान पूर्ण क्षमतेने प्रवासी गाडी अजूनही सुरू झाल्या नाहीत.
काही गाड्यांचे मार्ग वळवले
बडनेराजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून उतरल्याने अनेक गाड्यांना फटका बसला. रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळविले होते. सणासुदीच्या दिवसात उशिरा धावणाऱ्या आणि मार्ग बदलविल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहेत.
तिसऱ्या व चवथ्या लोहमार्ग कामाचा फटका
नागपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान तिसऱ्या व चवथ्या लोहमार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकदा मेगा ब्लाॅक घेतला जातो. दुसरीकडे मालगाड्या मात्र नियमित धावताना दिसतात.
पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरु करा
नागपूर विभागात मुंबई हावडा रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्या उशिरा धावतात. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो. नागपूर गोंदिया डोंगरगड दरम्यान पॅसेंजर गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाही.- प्रा. संजय बुराडे, रेल्वे प्रवासी, तुमसर
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्या अनेकदा लेट धावतात. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो तसेच नागपूर गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.- एम.डी. आलम खान, रेल्वे समिती सदस्य तुमसर रोड.