करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या जमिनीला व पिकांना थंडावा मिळाला असला तरी रखडलेली रोवणी सुरू होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते. परिसरात आतापर्यंत केवळ २० टक्के सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी झाली असून, ८० टक्के शेती पडीत आहे. कडक उन्हामुळे बोअरवेल्स व विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. करडी परिसरात अजूनही ४,५०० हेक्टर हेक्टर शेती रोवणीविणा पडीत आहे. कडक उन्हाने जमीन तापलेली असून, रोवणीला भेगा पडल्या आहेत. अशा स्थितीत पऱ्हे वाचवायचे की, रोवणी झालेली पिके, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिसरातील तलावांत पाण्याचा अत्यल्प साठा असून, लहान बोड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. नाले व बंधारे कोरडी आहेत. करडी परिसरात ९० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीवर आधारित जोडधंदे हेच आहेत. जोडधंद्यावर त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषण होत आहे. शेतीच्या माध्यमातून धानाचे उत्पादन काढून घरातील परिवाराचा प्रपंच चालवून मुलाबाळांचे शिक्षण व अन्य खर्च केला जात असताना यावर्षी निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांनी हलक्या धानाचे पऱ्हे घातले. त्यास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पावसाअभावी रोवणी झालेली नसल्याने हलक्या धानाची मुदत संपत चालली आहे. लागवड उशिरा झाल्यास पाहिजे तेवढे उत्पादन हाती पडणार नाही, शेतीत खर्च केलेला पैसा निघणार किंवा नाही, याची शंका शेतकऱ्यांना आहे. सद्य:स्थितीत रासायनिक खते, मशागत, मजुरी आदींचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण होण्याचा धास्ती शेतकऱ्यांत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करडी व पालोरा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बॉक्स
खतांची वाढली मागणी
पंधरा दिवसांनंतर रिमझिम पावसाचा आरंभ होताच शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा रोवणीला सुरुवात करण्यासाठी खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिश्र खताची मागणी होत आहे; परंतु खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.