लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गतवर्षी खरीप हंगामात १,१८,०९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला होता. यंदा हंगामाच्या प्रारंभीच अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. त्यामुळे यंदा १,९७,१७८ शेतकऱ्यांनी एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ७९,०८० शेतकरी संख्या वाढली असून पिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे; परंतु गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळालेला नव्हता. निदान यंदा तरी नुकसानीचा विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत पिकांना विम्याचे संरक्षण लाभावे, यासाठी यावर्षी १ लाख ९७ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांत मोहाडी तालुका आघाडीवर आहे. यावर्षी एकूण विमा संरक्षित रक्कम ४१६.०१ कोटी एवढी आहे, तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यात कर्जदार शेतकरी संख्या १,३८,०९९ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४१,०७९ एवढी आहे.
पीक विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी तालुका शेतकरी संख्या भंडारा २३६९० मोहाडी ३१६७८ तुमसर १९८५४ पवनी २५२४७ साकोली २६७६० लाखनी २७७४० लाखांदूर २४५०९ एकूण १,९७,१७८
या पिकांना विमा लागू खरीप हंगामात धान या पिकासाठी सर्व ४० महसूल मंडळे अधिसूचित आहेत. तसेच सोयाबीनसाठी भंडारा, मोहाडी, लाखांदूर व पवनी तालुक्यांतील २६ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. धान व सोयाबीन पिकासाठी विमा लागू आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात विमा उतरण्याची सुविधा केली आहे.
लाडकी बहीण' मुळे वाढली होती मुदत यंदा शासनाने पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पीक विमा काढण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विमा काढण्याची मुदत शासनाने ३१ जुलैपर्यंत वाढवली होती.
शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणदरवर्षी पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे यावर्षी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते. मागील वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण दरवर्षी पाहावयास मिळते, हे विशेष.