लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पाऊस थांबता थांबायचे नाव घेत नाही. दररोज जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी पहाटेपर्यंत सर्वदूर पाऊस कोसळला. गत २४ तासांत तीन तालुक्यांसह १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या भंडारा तालुक्यात तब्बल १३७ मिमी पाऊस कोसळला. तर जिल्ह्यात सरासरी ५५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऐन धान काढणीच्या वेळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला जात आहे.जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून एक दिवसाआड पाऊस बरसत आहे. तीन दिवसांपासून तर पाऊस थांबायचे नाव घेत नाही. मंगळवारी सकाळपासून पाऊस कोसळायला सुरुवात झाली. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रात्री ११.३० वाजता प्रचंड विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. अलीकडच्या काळात दसऱ्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची ही पहिलीच वेळ असावी. गत २४ तासात जिल्ह्यात ५५.३ मिमी पाऊस कोसळला असून त्यात भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील भंडारा महसूल मंडळात १३७ मिमी, धारगाव ६५.२ मिमी, खमारी ९२.४ मिमी, मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात ८५.६ मिमी, वरठी ९०.६ मिमी, करडी ८२.५ मिमी, कांद्री ८९.२ मिमी, कान्हळगाव ८८.२ मिमी, आंधळगाव ९०.२ मिमी, तुमसर तालुक्यातील तुमसर मंडळात ८४ मिमी, सिहोरा ६८.२ मिमी, आणि मिटेवानी मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली.हवामान खात्याने १३ ऑक्टाेबरपर्यंत येलो अलर्ट दिला असून या पावसाची धास्ती आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. जिल्ह्यात हलका धान काढणीला आला आहे. अनेक ठिकाणी धान कापणी झाली असून कडपा बांधून शेतात आहे; मात्र दररोज पाऊस कोसळत असल्याने धान कडपा ओल्या होत आहेत. शेतात उभा असलेला धान वादळी पावसाने आडवा झाला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवसत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कापलेला धान ओला होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने धान पाखर होण्याची भीती आहे.ओला दुष्काळ घोषित कराजिल्ह्यात सातत्याने पाऊस कोसळत असून हाताशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज असून धानावर कर्ज फेडण्याची तयारी होती. परंतु पावसाने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.सिहोरा परिसरात धानाचे नुकसानतुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील चुल्हाड, बपेरा, सिहोरा, येरली आदी गावांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. संपूर्ण धान पीक जमीनदोस्त झाले आहे. पाऊस सुरु असल्याने धान कापणीत अडचण येत असून वादळी पावसाने धान ओला होवून जमीनदोस्त झाला. साकोली तालुक्यातही मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारा जोरदार पाऊस झाला. लाखनी, मोहाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसाने आता शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
भंडारा शहरात वीज रात्रभर खंडित
- भंडारा शहरात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या प्रचंड कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास मुसळधार पाऊस बरसला. रात्री १.३० वाजताच्या सुमारास तर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसाने रात्री शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. शहराजवळून वाहणारी वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे.- हलका व मध्यम धान कापणीस आला आहे. १०० ते १२० दिवसांचे धान संपूर्णतः जमीनदोस्त झाले असून, अंकुर येण्याची शक्यता आहे. कापणी झालेले किंवा कापणी योग्य धानाच्या बांधातील पाणी बाहेर काढावे. उताराच्या दिशेने पाण्याची व्यवस्था करावी. कडपा उचलून उंच भागावर ठेवावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वादळी पावसाने धान जमीनदोस्त
- लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी पहाटे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात हाताशी आलेले धान पीक जमीनदोस्त झाले. शेतात उभे असलेले पीक सडण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा
- परतीच्या पावसाने पिकांना झोडपून काढले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला. परंतु तीनदा नुकसान होऊनही विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा. खमारी नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा जिल्हा परिषद सदस्य रजनिश बंसोड, कारधाचे सरपंच आरजू मेश्राम यांनी दिला आहे.
खमारी पुलावर चार फूट पाणी, वाहतूक ठप्प
- जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने धान पीक जमीनदोस्त झाले. हलक्या धानाच्या कळपा पाण्यात ओल्याचिंब झाल्या असून, भंडारा तालुक्यातील खमारी नाल्याच्या पुलावर चार फूट पाणी वाहत होते. खमारी मार्गावरील पूल कमी उंचीचा असल्याने पाण्याखाली आला. दिवसभर वाहतूक बंद पडली होती. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक घरादारांचे नुकसान झाले. मंगळवारला सकाळपासून पावसाने झड लावली. कौलारू घरात पाणी शिरल्याने पडझड झाली. काही घरे कोसळली. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या हलक्या धानाची कापणी जाेमात सुरू आहे. तर भारी वाणाचे धान लोंबीवर आले आहे. पावसाचे पाणी शिरल्याने ओल्याचिंब कळपांना दुर्गंधी सुटली आहे. कडपा वाळवायच्या कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.