मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात दुपारपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. बोरी, करडी, मुंढरी, कन्हाळगाव, बोरगाव, जांभोरा, पालोरा, लेंडेझरी, किसनपूर, निलज खुर्द या गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पऱ्हे पेरणी केलेल्या बांध्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक शेतकऱ्यांनी बांध्यातील अतिरिक्त पाणी सोडले. त्यामुळे नाले खळखळून वाहू लागले. बांध्यातील पाणी सोडले नाही, तर बांधातील पऱ्हे पिवळे पडून सडू शकते.
बॉक्स
जिल्ह्यात आतापर्यंत २२७ मिमी पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत २२७.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. १ जून ते २४ जून या कालावधीत १५६.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. या कालावधीत २२७.९ मिमी पाऊस कोसळल्याने सरासरीच्या १४६ टक्के पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक पाऊस लाखांदूर तालुक्यात २७९.८ मिमी नोंदविण्यात आला आहे. भंडारा १९१.८ मिमी, मोहाडी २७०.४ मिमी, तुमसर २२६.७ मिमी, पवनी २११.२ मिमी, साकोली १९७.२ मिमी, लाखनी २१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.