प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत राजापूर येथील जना बाबूराव मेश्राम यांच्या नावाने घरकुल मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे तीन टप्पे जमा झाले. परंतु त्यांचा २६ डिसेंबर २०२० ला मृत्यू झाला. त्यांचे एकुलते वारस अरुण मेश्राम यांना ग्रामपंचायतीने ठराव घेऊन आईच्या खात्यातील पैसे मिळण्याकरिता खंडविकास अधिकाऱ्यांना विनंती केली. खंडविकास अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेला पत्र पाठविले असून बँक पत्र देण्यास तयार नाही. बँकेने जेथून पैसे आले, तेच तुमच्या खात्यात थेट वळते करतील, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे घरकुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. भर पावसाळ्यात मेश्राम कुटुंबीय उघड्यावर पडले. पाऊस आला की गावात फिरून फिरून अरुण व त्यांच्या परिवाराला विश्रांतीकरिता आसरा घ्यावा लागतो. यामुळे मेश्राम कुटुंबीय मेटाकुटीस आले असून बँक कर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे मेश्राम कुटुंबीयांना मानसिक त्रास होत आहे. खंडविकास अधिकाऱ्यांनी विश्राम कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी घरकुल लाभार्थी अरुण मेश्राम यांनी केली आहे.