बीएसएनएलची करामत : सेवा देण्याची हमी खंडीत, मोहाडी तालुक्यातील प्रकारराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : या पोलीस स्टेशनचा फोन बॉक्स बंद पडला आहे. त्याचा फटका ‘हॅलो अन् जयहिंद’च्या आवाजाला बसला आहे. ‘कनेक्टींग इंडिया, अहर्निश सेवामहे’ ब्रीद वापरणाऱ्या भरत संचार निगम लिमिटेडची खंड ‘सेवामहे’ अशी अवस्था झाली आहे. पावसाळ्यात बीएसएनएनलची लँडलाईन सेवा विस्कळीत होते. तसेच इतर मोसमातही सेवा उत्कृष्ट असल्याची हमी नसते. आजही अनेक शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेडचे टेलीफोन बॉक्स दिसतात. मोहाडीतला पोलीस स्टेशनमध्येही बीएसएनएलचा टेलिफोन बॉक्स लावलेला आहे. पण ०७१९७ - २४११२२ या नंबरवर कॉल करा. थकून जाल पण तिकडून हॅलो अन् जयहिंदचा आवाजच येत नाही. कसा येणार? फोन बंद, रिंग जातेय. पण, उचलला जात नाही. टेलिफोन करून करून डोक्याचा ताप वाढतो. मनस्ताप होतो. रागाचा पारा वर चढतो. पण नाईलाज आहे. कालांतराने रागाचा ताप खाली येतो. या सगळ्या मनस्तापाला कारणीभूत आहे मोहाडीत असलेली बीएसएनएलची सेवा. मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये लँड लाईनवर फोन असणाऱ्या जनतेची चांगलीच फसगत होते. साधारण व्यक्तींजवळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा मोबाईल क्रमांक नसतो. पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात दूरध्वनी क्रमांक दिला गेला आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती त्याच दूरध्वनीचा उपयोग करतात. पण, बीएसएनएलची ‘खंडमहे सेवा’ असल्याने सामान्य तक्रारकर्त्यांना पोलीस स्टेशन गाठावा लागतो. पोलीस स्टेशनचा टेलिफोन सुरु असला तर फोन केल्यावर ऐकू येते ‘जयहिंद सर’ हा आदरयुक्त आवाज. तुम्ही कोण हे विचारण्यासाठी प्रत्येकांना आदर अन् सन्मान देणारा आवाज मोहाडीच्या बीएसएनएलने हिरावून घेतला. आहे. ग्रामीण भागात बऱ्याच घटना होतात. त्या घटनेची पहिली खबर देण्यासाठी आधी दूरध्वनीच्या नंबरवर अनेकजण कॉल करतात. त्यानंतरच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला जातो. कधी कधी नो नेटवर्कचा फटका कॉल करणाऱ्यांना बसतो. अधिकाऱ्यांना थेट फोन करण्याची सवय नसलेली सामान्य माणसे घाबरतात. त्यामुळे लहान सहान घटनेची खबर पोलीस स्टेशनला मिळत नाही. तसेच टेलिफोन बंद असल्याने कोणाचा फोन आलाय याची खबर पोलीस स्टेशनला लागत नाही.दूरध्वनी सेवा बंद असल्याची तक्रार दिली आहे. काम सुरु असल्याचे सांगितले गेले आहे.-सुनिल तेलुरे, पोलीस निरीक्षक, मोहाडी.
हॅलो अन् जयहिंदचा आवाज ‘बीएसएनएल’ने हिरावला
By admin | Published: July 12, 2017 12:23 AM