पालांदूर
: निसर्गाच्या दुष्टचक्राने लाखनी तालुक्यातील शेतकरी नुकसानास पात्र ठरलेले आहेत. गत १० व १६ मे रोजी अस्मानी संकटाने धानाचे व भाजीपाला क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत गरजेची आहे. ३३ टक्के नुकसानीची अट शिथिल करीत नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केली आहे.
लाखनी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने ६२ गावे प्रभावित झाली आहेत. ८३५.७० हेक्टर धानाचे गारपिटीने नुकसान झालेले आहे. यात ३३ टक्क्याच्या वर व ३३ टक्क्याच्या आत अशी वर्गवारी करून नुकसानभरपाईचा नजरअंदाज तयार करण्यात आलेला आहे. ३३ टक्क्यांची नुकसानभरपाई मोजणीचे माप प्रमाणित केले आहे काय, ३२ टक्के नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांचा वाली नाही काय, टक्केवारीत नुकसान दाखवून प्रभावित शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय, आदी प्रश्नांची उत्तरे निश्चितच क्लिष्ट आहेत. शेतकऱ्यांची अगतिकता ओळखत त्यांच्या परिश्रमाची किंमत करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उत्पादित खर्च सारखाच लागलेला आहे. त्यामुळे ३३ टक्क्याची ही वर्गवारी निश्चितच चुकीची वाटत आहे. जेवणाळा, इसापूर, मचारना, गोंडेगाव, गुरढा, खुणारी खराशी, भूगाव, कवडसी आदींसह ६२ गावांतील शेतकरी बाधित झाले आहेत. तेव्हा निश्चितच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत अत्यावश्यक झाली आहे. गत खरिपातसुद्धा हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने शेवटच्या टोकात हिरावून घेतले. त्यावेळी अपेक्षित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. खरिपाची कसर उन्हाळी हंगामात निघेल, या आशेने उन्हाळी धान जोखीम पत्करत लावले. मात्र, निसर्गाच्या दुष्टचक्राने हिरावून नेले.