भंडारा : हातावर कमावून पानावर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांचाही समावेश आहे. ऑटो धावला नाही तर घरातील चूलही पेटणार नाही अशी अवस्था ऑटोरिक्षाचालकांची आहे. त्यातही संचारबंदीमुळे ऑटोरिक्षा बंद असल्याने जिल्ह्यातील या चालकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने ऑटोरिक्षा चालकांना घोषित केलेली दीड हजार रुपयांची मदतही अजूनपावेतो मिळालेली नाही.
प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. नागरिक, विद्यार्थी व अन्य वाहतुकीची व सुरक्षेची खात्री करून अन्य ठिकाणी पोहोचविण्याचे उत्तम साधन म्हणून ऑटोरिक्षाची ओळख आहे.
गतवर्षीपासुन सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे, तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे ऑटोरिक्षा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत कुटुंबाचा गाढा ओढायचा तरी कसा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे. अनेक रिक्षाचालक मोलमजुरी करीत आहेत. संचारबंदी घोषित करण्यापूर्वी कष्टकऱ्यांना उपाशीपोटी राहू देणार नाही अशी ग्वाही देत राज्य शासनाने ऑटोरिक्षा चालकांनाही दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही.
ऑटोरिक्षा बंद असल्याने गत २० दिवसांपासून रोजी मिळाली नाही. हाताला काही काम मिळेल या आशेपोटी घराबाहेर गेल्यास संचारबंदीमुळे कामही मिळत नाही. शेतशिवारातही काम उपलब्ध असले तरी अपेक्षेप्रमाणे मजुरी मिळत नाही. शेतातही साहित्य पडून असल्याने त्यांच्याकडून मजुरी मिळेल किंवा नाही अशीही चिंता सतावते. शासनाने मदत करण्याची घोषणा केली. २५ दिवसांचा कालावधी लोटला; पण मदत मिळालेली नाही. शासन आमची थट्टा तर करीत नाही ना असे वाटते.
-सरोज रामटेके, ऑटो रिक्षाचालक
संचारबंदीमुळे ऑटोरिक्षा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आमचे संपूर्ण आयुष्य ऑटोरिक्षा चालविण्यात गेले. दुसरा व्यवसाय काय करावा, असाही प्रश्न उपस्थित होतो. व्यवसाय करण्यास गेले की हातात पैसा नाही. कुटुंबाचा गाढा ओढायचा की व्यवसायात पैसे गुंतवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तुटपुंजी मदतीची घोषणा केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. दीड हजार रुपये कधी मिळणार हे दिवास्वप्नच वाटते.
-संजय हटवार, ऑटो रिक्षाचालक
कोरोना महामारीचा मोठा फटका ऑटोरिक्षा व्यवसायाला बसला आहे. मध्यंतरी पेट्रोलचे भाव १०० च्या वर पोहोचले. ते दर आजही कायम आहेत. संचारबंदीमुळे ऑटो धावत नाही. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही काळ काम मिळाले, मात्र त्यानंतर पुन्हा व्यवसाय बंद पडले आहेत. शासन मदत करेल या अपेक्षेत आम्ही आहोत. मात्र, मिळणारी मदतही तोकडीच आहे. दीड हजार रुपयांत काय करावे आणि काय नाही अशी अवस्था आमची झाली आहे. नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षाचालकांना मदत मिळेल; पण ज्यांची नोंदणी झालीच नाही अशा रिक्षाचालकांनी करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. - गुरुदेव बोंदरे, ऑटो रिक्षाचालक
ऑटोरिक्षा म्हणजे जीवनवाहिनीचे कार्य करून इतरांना गंतव्य ठिकाणी पोहोचवत असतो. मात्र, गत २० दिवसांपासून आमचा व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. कुठे अन्यत्र कामही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. घोषणेअंतर्गत मदत तत्काळ मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, तीन आठवडे लोटूनही मदत बँकेच्या खात्यात जमा झाली नाही. आता मदत खूप उशिरा मिळत असेल तर त्याला अर्थही राहणार नाही. किंबहुना मिळणारी मदतही तुटपुंजी असल्याने त्यात कुठल्या गरजा पूर्ण करायच्या असा प्रश्न उपस्थित होईल. कुठलेही नियोजन करताना त्यातील मदत लवकर मिळावी अशी आमची मागणी आहे. - विनोद डोरले, ऑटो रिक्षाचालक