फोटो
लाखनी : भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात तो सतत मदतीसाठी उभा असतो. तो आज उभा ठाकला डॉ. चंद्रकांत निंबार्ते अन् सुनील लुटे यांच्या रूपाने. राहायला हक्काचे घर नसलेल्या व आयुष्याच्या सायंकाळी हाथठेल्यात आपला संसार थाटणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला भेट देऊन मदत केली. त्यांना माणुसकी जपत मदत करून जगण्यास बळ दिले. समर्थ विद्यालयाच्या १९९१ बॅचच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला आहे.
लाखनी तालुक्यातील झरप येथील कुंभरे वृद्ध दाम्पत्याची ही व्यथा कानी पडताच लाखनीचे समाजसेवी डॉ. चंद्रकांत निंबार्ते अन् घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे यांची पावले वृद्ध दाम्पत्याकडे चालू लागली. एकुलता एक कमावता मुलगा मृत्युमुखी पडल्यानंतर आयुष्याचा सायंकाळचा आधार हिरावल्यानंतर चपला दुरुस्तीचा धंदा गावोगावी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याच्या हाथठेल्याकडे डॉक्टर आणि पोलीस पाटलांची पावले चालू लागली. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या खांद्यावर हाथ ठेवून मायेचा ओलावा दिला. डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते व सुनील लुटे या समाजसेवकांनी कुंभरे वृद्ध दाम्पत्यांना पाच हजार रुपयांचा किराणा, दोन ब्लँकेट व साडी-धोतर देऊन मदत केली. यावेळेस समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुबारक सय्यद, डॉ. गिरिजा शंकर लांजेवार, डॉ. गणेश मोटघरे, श्रीधर काकीरवार उपस्थित होते.
विमान भिवा कुंभरे व लीलाबाई विमान कुंभरे हे वृद्ध जोडपे मूळचे झरपचे. घरकुलासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही घरकुल मिळाले नाही. त्यामुळे विमान भिवा कुंभरे आणि लीलाबाई विमान कुंभरे हे वृद्ध दाम्पत्य लाखनी तालुक्यातील झरप येथे गावाबाहेर असलेल्या एका लाकडी हाथठेल्यात गेल्या कित्येक वर्षांपासून आपला संसार थाटून राहत आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे चपला दुरुस्तीचा, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला; परंतु जिद्दीच्या जोरावर स्वतःचं घर नसतानी झरपसारख्या लहानशा खेड्यात गावाबाहेर असलेल्या हाथठेल्यात लीलाबाई आणि विमान या वृद्ध दाम्पत्यांनी चपला शिवण्याचा व्यवसाय करून संसार जोडता केला. राहण्यासाठी साधे घरे बांधणे शक्य नसल्याने आता मुलाच्या माघारी एका हाथठेल्याच्या आश्रयाने त्यांना राहावे लागत आहे. हाथठेला असुरक्षित आहे.
बॉक्स
३० वर्षांपासून जगण्याचा संघर्ष
कुंभरे दाम्पत्याचा ३० वर्षांपासून जगण्याचा संघर्ष सुरू आहे. आता शरीर साथ देत नाही. वयाची सात दशके उलटली आहेत. कोरोनामुळे कामही नाही. अशा परिस्थितीत उपासमार होते. कधीकाळी घोडेझरीला गेलो तर पोलीस पाटील सुनील लुटे हक्काने जेवायला देतात आणि लीलाबाईंसाठी जेवण बांधून देतात. थोडीबहुत जगण्याची आशा जिवंत आहे. डॉ. निंबार्ते आणि सुनील लुटे यांनी मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली असून, घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊन हक्काचे घर आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला तर हा माझ्या जगण्याचा संघर्ष सार्थकी लागेल, असे या वृद्ध दाम्पत्यांनी सांगितले. घरकुलासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेला आहे.
120921\img-20210912-wa0085.jpg
photo