ताडगावटोली येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी गॅस सिलिंडरची वायुगळती झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५) रात्री घडली होती. यात पंधरे कुटुंबातील पाच व शेजारील एक असे सहा जण भाजले होते. त्यापैकी चार जण अद्याप भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. गॅस वायुगळती झाल्याने घरात आगीचे लोळ पसरले होते. गावचे उपसरपंच दामोधर शहारे व इतर लोकांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. मात्र, घरातील जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. अशात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम व अर्जुनी मोरगाव तलाठी संघटनेने प्रत्येकी पाच हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची रोख मदत केली. गोंदिया राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी ५० किलो तांदूळ व २५ किलो गहू अशी मदत केली. शिल्पा सोनाले यांच्या हस्ते पंधरे कुटुंबीयांना सोमवारी ही मदत देण्यात आली. यावेळी तहसीलदार मेश्राम, उपसरपंच दामोधर शहारे, पोलीसपाटील अभिजित नाकाडे, तलाठी पुंडलिक कुंभरे व तलाठी श्रीधर चचाणे उपस्थित होते.
पंधरे कुटुंबाला सामाजिक बांधिलकीतुन मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:22 AM