मुखरू बागडे
पालांदूर (भंडारा) : खरिपाचा हंगाम मान्सूनपूर्व मशागतीने अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. सिंचित क्षेत्रातील शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहेत तर कोरडवाहूचा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट बघत आहे. पेरणीचा हंगाम साधला तरच रोवणीचा हंगाम जोमदार ठरतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांची माहिती व काळजी अत्यंत महत्त्वाची ठरते.
कृषी विभाग दरवर्षी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करीत नवनवीन माहिती देतो. तरीही काही शेतकरी जुन्याच चुकीच्या पद्धतीने शेती करतात. तेव्हा नव्या ज्ञानाचा, अभ्यासाचा शेतकरी आपल्या भावास म्हणतो, धानाची शेती करतोस... तर मग कृषी विभागाच्या काही टिप्स जाणून घे!
खरीप हंगामात मुख्यत्वे करून भात पिकाची लागवड केली जाते. बाजारातील भात पिकाच्या वाणांची खरेदी करताना बियाणांचा योग्य दर्जा व उत्कृष्ट गुणवत्ता असल्याची खात्री करून बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. बोगस बियाणे हे पावती शिवाय विकले जाते. त्यामुळे अशा बियाणांची खरेदी करून पेरणी करणे नुकसानदायक आहे. परवानाधारक व अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.
बियाणे सीलबंद वेष्ठनातील, लेबल असलेले व लेबलवर बियाणाबाबत संपूर्ण तपशील नमूद असलेले तसेच वैध मुदतीत असलेले बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे. पेरणीच्या वेळी पिशवीच्या खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे व थोडे बियाणे पिशवीतच शिल्लक ठेवावे. पक्के बिल, लेबल व काही शिल्लक ठेवलेले बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे. छापील किमतीपेक्षा अधिक दराने व विना पावतीचे बियाणे खरेदी करू नये. पावतीवर खरेदीदार शेतकरी व विक्रेता यांची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तेव्हाच बियाण्यांची खरेदी करावी.
कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये
अत्यंत स्वस्त दरात विकले जात असलेले बियाणे अनधिकृत व निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. बियाणांचा दर्जा, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता बाबत काही तक्रार असल्यास जवळच्या पंचायत समिती किंवा राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.
हे करून बघा...
बियाणे पेरणीपुर्वी उगवण क्षमता तपासावी व योग्य उगवण क्षमतेच्या बियाणांची तीन टक्के मिठाच्या दावणाची व बुरशीनाशकाचे बीजप्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करताना प्रथम मिठाच्या ३ टक्के द्रावणामध्ये (३०० ग्राम मीठ + १० लिटर पाणी) टाकून ढवळून हलके, रोगग्रस्त पाण्यावर तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन २४ तास सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा कॉर्बेनडिझिम किंवा थायरम यापैकी एका रासायनिक बुरशी नाशकाची २.५ ग्राम ग्राम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणूंची प्रत्येकी २५० ग्राम प्रति दहा किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून सावलीत सुकवून पेरणी करावी.
जिवाणू खताकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली इथे संपर्क करता येईल. बियाणे निवड करताना जमीनपरत्वे व सिंचनाची सोय लक्षात घेऊनच हलके, मध्यम व भारी कालावधीच्या वाणांची निवड करावी. रब्बी पिकाची वेळेवर पेरणी होणे करिता हलक्या व मध्यम जाती योग्य ठरतात. कोरडवाहू क्षेत्रात भात बियाणे पेरणी करताना घाई न करता १०० मी.मी. पाऊस झाल्यावर व जमिनीत १५ ते २० से.मी. खोलीपर्यंत ओलावा पोहोचल्यानंतरच हवामान अंदाज घेऊन पेरणी करावी.
- किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली