भंडारा : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री आंदोलनस्थळी न थांबता निघून गेल्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व महामार्ग रोखून धरीत वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास १५०च्या वर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अचल मेश्राम, दिलीप उटाणे, वैभव चोपकर, चंद्रकुमार बारई, डॉ. अमित जवंजार, डॉ. तुषार मस्के, विशाल वासनिक, डॉ. शैलेश कुकडे, धनपाल गडपायले यांच्यासह दीडशेच्यावर महिला व पुरुष कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
सोमवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनस्थळी मुख्यमंत्री भेट देतील, अशी आशा होती. मात्र त्यांचा ताफा निघून गेल्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी महामार्गच रोखून धरला. जिल्हा परिषद चौकात झालेल्या अनपेक्षित प्रकाराने जिल्हा पोलिस प्रशासनही गोंधळून गेले.
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत मार्ग काढण्यात आला. मात्र तब्बल ३० मिनिटांपर्यंत महामार्ग रोखून धरणे व शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिस हवालदार स्वप्निल भजनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. यात दीडशेच्यावर अधिकारी कर्मचाऱ्यांसह नेतृत्व करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रोखून रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तसेच जिल्हा दंडाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात भादंविच्या ३४१, १४३ कलम व महाराष्ट्र पोलिस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार जनबंधू करीत आहेत.
घोषणा देणाऱ्या त्या दोघांवरही गुन्हा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना दोन इसमांनी घोषणाबाजी केली होती. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा’ असे जोरात घोषणा दिल्याने कार्यक्रमस्थळी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व संताेष बकाराम पडोळे (४७, रा. जाख गिरोला) व एजाज अली नाबी अली सय्यद (४२, रा. बाबा मस्तान शहा वाॅर्ड) असे गुन्हा दाखल केलेल्या इसमांची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे घोषणा दिलेल्या या दोघांनाही सभेनंतर शहापूर येथील हेलिपॅड परिसरात नेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घालून देण्यात आली होती. त्या दोघांनीही आपल्या मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना सोपविले होते.