लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाधिकाऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची ग्वाही दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरताच अवघ्या काही वेळातच पोलिसांनी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पाण्याअभावी धानपीक वाळत चालले आहे. कोरड्या दुष्काळाचे जिल्ह्यावर सावट पसरले आहे. भंडारा व मोहाडी तालुक्यातील बहुतांश शेती पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येतो. दोन दिवसांपुर्वी खुर्शीपार येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी दिले होते. परंतु भंडारा तालुक्यात पाणी पोहचलेच नाही. उलट धान पिकांला पाणी देण्याऐवजी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले. पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडून नुकसान भरपाई देण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने बुधवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गुरुवारपर्यंत पाणी पोहचले नाही, तर ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर शिवसैनिकांनी नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग मुजबी येथे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी टायर पेटवून, वाहतूक रोखून धरण्यात आली होती. परिणामी वाहतुक विस्कळीत झाली. वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या आंदोलन तिव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये आंदोलनकर्त्यांना अटक करुन भंडारा ठाण्यात आणण्यात आले. आम्हाला प्रशासनाने धोक्याने अटक केली आहे. चर्चेसाठी जायचे असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात आण्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.या आंदोलनात शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, सुरेश धुर्वे, मयुर लांजेवार, प्रभु हटवार, विलास लिचडे, नरेश झलके, अनिल कडव, चेतन भुरे, हेमंत भुरे, नरेश लांजेवार, राजश्ो सार्वे, रविकांत आकरे, मुकेश ठवकर, निलकंठ मानापुरे, रंजीत आकरे, रामंचद्र बुरडे, प्रशांत कुकडकर, अनिल चकोले आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
सिंचनासाठी महामार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:49 AM
जिल्हाधिकाऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची ग्वाही दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देशिवसेना आक्रमक : शेकडो शेतकऱ्यांसह शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात