अशाेक पारधी
भंडारा : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी येथील वैनगंगेच्या तिरावर विविध घाट आहेत. यापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला हाेता. मात्र, आता हा घाट अखेरच्या घटका माेजत असून आजपर्यंत कधीही या घाटाची डागडुजीच करण्यात आली नाही.
पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. पानखिडकी, ताराबाई, वैजेश्वर या घाटांसाेबतच दिवानघाट प्रसिद्ध आहे. साधारणत: तीनशे पन्नास वर्षांपूर्वी हा घाट बांधला. चाैकनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आले. परंतु नदीला आलेल्या महापुराने या घाटाची पूर्णता दुरवस्था झाली आहे.
पाैर्णिमा, हरितालिका, गणेशाेत्सव आदी सणांच्यावेळी दिवाणघाटावर माेठी गर्दी हाेते. परंतु येथील घाटाची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जाताे. घाटाचे बुरूज ढासळलेले असून केवळ एका ठिकाणाहून नदीपर्यंत पाेहोचता येताे. ताे कधी ढासळेल याची शाश्वती नाही. मासेमारी करणारे ढिवर बांधव साेडले तर इतर काेणाचीही हिम्मत हाेत नाही. पायऱ्यांना भेगा पडल्या आहे. बुरूज ढासळत असून दखल न घेतल्यास चार ते सहा महिन्यांत दिवाणघाट इतिहास जमा झाल्याशिवाय होईल.
तीन घाटांचा समूह दिवाणघाट
दाेन जवळजवळ व एक त्याच रांगेत बाजूला रांगेत असे तीन घाट मिळून बांधलेला समूह म्हणजे दिवाणघाट हाेय. भाेसले राजवटीत एक दिवाण नावाचे दानशूर व्यक्ती पवनी येथे राहत हाेते. त्यांना वैनगंगा नदीचा परिसर आवडला. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने घाट बांधला. ३५० वर्षे उलटून गेले तरी दिवाणघाट म्हणून त्याची ओळख आहे.
घाट पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न शून्य
पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता वैनगंगा नदीवरील घाटांमध्ये आहे. परंतु घाटाच्या पुनर्निर्मितीसाठी काेणतेही प्रयत्न झाले नाही. ना नगर परिषदेने जबाबदारी घेतली, ना पुरातत्त्व विभागाने. या घाटांची पुनर्निर्मिती झाली तर पर्यटनासाठी माेठी संधी आहे. पर्यटनाचा विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल आणि राेजगाराची संधीही निर्माण हाेईल.