भंडारा : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडताना पाेलीसदादांच्या खांद्यावर कधीकधी अतिरिक्त जबाबदारीही येऊन ठेपते. कुटुंबाकडे तर अक्षम्य दुर्लक्ष हाेते. ताणतणावात कर्तव्य बजावत असतानादेखील सर्वच बाबींवर लक्ष देत पाेलीस अधिकारी व कर्मचारी कार्य पूर्ण करतात. यातही काही अधिकारी व कर्मचारी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यास विसरत नाही. आपल्यामध्ये असलेल्या छंदाला कधी स्वत:साठी तर कधी सर्वांसाठी वाहून घेतात.
भंडारा जिल्हा पाेलीस दलातही असेच अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व दडून आहेत. यात पाेलीस कर्मचारी टिकाराम राघाेजी काेरे, दीपक हरिशचंद्र बुलबुले, याेगिनी ललित नाकताेडे व निरज प्रभाकर साबळे यांचा समावेश आहे. या सर्वांनी विविध कलेच्या माध्यमातून आपल्यामधील छंद विकसित करून इतरांनाही आनंदीमय जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे.
आपल्या सभाेवताली वावरणाऱ्या व्यक्तींना आनंद कसा देता येईल याच संधीत ही छंद जाेपासणारे पाेलीस कर्मचारी सदैव असतात. त्यांचा हा छंद अनेकाना प्रेरणा तर देताेच; परंतु इतरांना सुखावूनही जाताे. अशा कर्म व मर्म जाेपासणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांना लाखमाेलाचा सलाम...