भंडारा : दहावीनंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे बँकेऐवजी पोस्ट पेमेंट बँकींग सेवा आयपीपीबीमार्फत देण्याचा निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला होता. या निर्णयाचा जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील सात हजार ७३५ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती खाते उघडण्यात आले असून, त्यांना शिष्यवृत्ती घरपोहोच देण्यात आल्याची माहिती पोस्ट पेमेंट बँकिंग सेवेचे भंडाराचे शाखा व्यवस्थापक वैभव बुलकुंदे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शिष्यवृत्तीचे पैसे काढण्यासाठी दूर अंतरावरील राष्ट्रीयीकृत बँकेत वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. बँकेतील संथ कारभारामुळे अनेकदा वेळेत शिष्यवृत्तीचे पैसेही मिळत नव्हते. मात्र, आता सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना घरपोहोच शिष्यवृत्ती मिळत असल्याने विद्यार्थ्यांची होणारी फरपट आता थांबली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळणे सुलभ होत आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक अथवा बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांना पोस्टात खाते उघडल्यानंतर त्वरित शिष्यवृत्ती मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाऱ्या लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा पोहोचविणे हा उद्देश भारतीय टपाल विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग सेवेमार्फत १ सप्टेंबर २०र्८ ला सुरू केला आहे. याच उद्देशाने जिल्ह्यात आतापर्यंत भंडारा तालुक्यातील १६५३, लाखांदुरातील ९८६, लाखणीत ९०८, मोहाडीत ६९४, पवनीत २०७४, साकोलीत ५९५, तुमसर ८२५ असे जिल्हाभरात एकूण सात हजार ७३५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिष्यवृत्तीसाठी खाते उघडली आहेत. या विद्यार्थ्यांना पोस्ट पेमेंट बँकिंग सेवेचे फायदे तसेच पोस्टाच्या असलेल्या अनेक वर्षांच्या विश्वसनीयतेबाबत पोस्ट कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती पोस्ट पेमेंट बँकिंग सेवेचे शाखा व्यवस्थापक वैभव बुलकुंदे, तसेच जिल्हा उपअधीक्षक गजभिये यांनी दिली.
बॉक्स
शेतकरी मजुरांनाही उघडता येते खाते
पोस्ट पेमेंट बँकिंग सेवाअंतर्गत जसे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरता आयपीबीपीचे खाते उघडता येते, तसेच शेतकऱ्यांनाही पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांचे तसेच मातृत्व वंदना योजना अंतर्गत लाभार्थी महिलांचे, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचेही आयपीबीपीचे खाते उघडता येते. यासोबतच गावातील अन्य नागरिकांनाही कुठल्याही बँकेत जेथे आधार संलग्न आहे, तेथून गावातच पोस्टातून पैसे काढता येतात. गावातच पोस्टाद्वारे रक्कम आधार इनेबल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून घरबसल्या विना शुल्क काढता येते, आदी विविध सुविधा पोस्ट विभागाने उपलब्ध केल्याने नागरिकांची बँकेत होणारी गर्दी कमी झाली आहे. या सोबतच ग्रामस्थांना चांगला दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
खातेधारक म्हणतात, बँकेपेक्षा पोस्टाची सेवा केव्हाही चांगली
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा आहेत. मात्र, याठिकाणी नागरिकांना बँकेकडून अनेकदा वेठीस धरण्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार विचारणा करूनही बँक अधिकारी, कर्मचारी खातेदारांना व्यवस्थित माहिती देत नाहीत. तासन् तास बँकेत ताटकळत उभे राहावे लागते. आपल्याच खात्यातील पैसे विचारपूस करण्यासाठी गेल्यानंतरही लाखाने पगार घेणारे बँक कर्मचारी उदासीन असतात. त्यातुलनेत पोस्टातील बँकिंग सेवा व अन्य कामकाजासाठी आपल्या घरी येऊन पोस्ट कर्मचारी चांगली सेवा देत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आता बँकेपेक्षा पोस्टाची सेवा केव्हाही चांगली असे सांगत आहेत.
कोट
पोस्टाचे कामकाज सकाळी असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थी, शेतमजूर, शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. याउलट बँकेत शेतकऱ्यांना आपले दिवसभराचे काम सोडून ताटकळत उभे राहिले तरी अनेकदा काम होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पोस्टाचीच सेवा खरोखर चांगली ठरत आहे.
संजय आकरे,
उपसरपंच खरबी नाका, भंडारा.