गावापासून दुरची घरे स्वस्त; पण जाणे-येणे महाग
भंडारा शहरापासून १० ते १५ किमी अंतरावर घराच्या किमती स्वस्त आहेत. पण या ठिकाणी दररोज ये-जा करण्यासाठी वाहनाचा वापर करावा लागेल. त्यातच पेट्रोल व डिझेलचे दर वाढले असल्याने दररोज ये-जा करणेसुद्धा परवडण्यासारखे नाही.
शहरापासून काही अंतरावर आता घरांचे आणि फ्लॅट स्कीमचे काम सुरू आहे. पण त्यांच्या किमतीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी त्यासाठी बँकांकडून मागविल्या जाणाऱ्या कागदपत्रांची संख्या मोठी असल्याने त्यांची जुळवाजुळव करताना अनेकांची दमछाक होत आहे.
घर घेणे कठीण...
बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मजुरीचे दरसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे घराचे बांधकाम करण्यासाठी तयार केलेले बजेट पुन्हा बिघडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस घर घेणे कठीण होत चालले आहे.
- बाबुलाल वासनिक
बँकांनी स्वस्त दरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले असले तरी कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर पगारातसुद्धा कपात झाली आहे. त्यामुळे नियमित खर्च सांभाळून गृहकर्जाचे हप्ते फेडणे कठीण बाब झाली आहे. परिणामी नातेवाइकांकडून उसनवारी घेऊन कर्जाचे हप्ते फेडण्याचे प्रयत्न आहेत.
- शैलेंद्र जांभुळकर
साहित्य विक्रेते म्हणतात....
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुरांची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कारखान्यात उत्पादन कमी प्रमाणात होत होते, तर त्या तुलनेत मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे सिमेंट, लोखंड यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आजही बांधकाम करणाऱ्या नागरिकांमध्ये महागाईची झळ कायम आहे. हाताला रोजगार नसल्याने बांधकाम साहित्य घेणे अवघड होते आहे.
- रजत जिभकाटे, विक्रेता
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, घर बांधकामाच्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी पुन्हा वाढली आहे. मात्र सिमेंट आणि लोखंडाचे दरसुद्धा चांगलेच वधारले आहे. बहुतांश नागरिक हे घरकुल लाभार्थी खरेदीसाठी येतात. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने त्यांची दुकानाकडे पाठ दिसून येते.
- मनोज साकुरे, विक्रेता