लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून संचारबंदी लागू केली आहे. दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संख्या थांबत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांवर उपचार करता-करता आरोग्य विभाग हतबल झाले आहे. कोरोना रुग्ण वाढीला कारणीभूत असणारे होम क्वारंटाईन व्यक्ती कुणालाही न जुमानता दिवसातून पाच ते सहा वेळा घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बोलले जात आहे.
वास्तविक होम क्वारंटाईन कोरोनाबाधित रुग्णांनी १४ ते १७ दिवसांपर्यंत सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नये असे असतानाही होम क्वारंटाईन रुग्ण गावात फिरत असल्यामुळे अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण साधारणत: १४ ते १७ दिवसांपर्यंत सामान्य निरोगी व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो. या बाबीकडे कोरोनाबाधित रुग्ण दुर्लक्ष करून मला काहीच लक्षणे दिसत नाही. मला काहीच त्रास नाही, मी बरा आहे, नार्मल झालो आहे. असे सांगून पाच ते सहा वेळा दिवसांतून घराबाहेर पडून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहे. अशा व्यक्तींनी घरी राहूनच प्रशासनाला, आरोग्य विभागाला मदत केली पाहिजे.